२०२२ साल संपण्यासाठी काही तास शिल्लक असताना नव्या वर्षाच्या सुरुवातीचा जल्लोष राज्यातील आरोग्य क्षेत्रातून गायब असणार आहे. सोमवारपासून राज्यभरातील सरकारी रुग्णालये तसेच मुंबई महानगरपालिकेच्या चारही प्रमुख रुग्णालयातील डॉक्टर्स तसेच पालिका रुग्णालयातील परिचारिकांनी संप पुकारला आहे. सेंट्रल मार्ड या निवासी डॉक्टरांच्या संघटनेने सोमवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. आपत्कालीन सेवा वगळता निवासी डॉक्टर्स कामावर हजर राहणार नाहीत. इंटर्न्स तसेच बॉण्डकाळातील डॉक्टरांच्या साथीने रुग्णसेवा सुरु ठेवण्याची तयारी पालिका रुग्णालयात सुरु झाली आहे.
सोमवारी मुंबई महानगरपालिका परिचारिका संघटनेने आपल्या मागण्यांसाठी मुंबईतील केईएम, सायन, कूपर आणि नायर या रुग्णालयांत एक दिवसांच्या संपाचे आयोजन केले आहे. परंतु सदस्यसंख्या अद्यापही फारशी नसताना संघटनेच्या संपाच्या आवाहनाला फारसा प्रतिसाद मिळणार नाही, असा दावा रुग्णालयातील अधिका-यांनी केला. मात्र पालिका रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचा दर महिन्याचा रखडलेला कोविड भत्ता या कारणामुळे निवासी डॉक्टरांच्या दुर्लक्षित प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष नसल्याचा आरोप करत मार्ड या निवासी डॉक्टरांची संघटना चांगलीच संतापली आहे. कोरोना काळात दर महिना सुरु केलेला कोविड भत्ता सप्टेंबर २०२२ मध्ये पालिका तसेच सरकारी रुग्णालयात बंद करण्यात आला. नायर रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या प्रश्नांकडे पालिका आरोग्य विभागाच्या वरिष्ठांकडून सातत्याने दुर्लक्ष झाल्याने वादाला तोंड फुटले. त्यातच गेल्या महिन्यापासून निवासी डॉक्टरांना सुरु झालेले वाढीव दरमहिना वेतन अद्यापही पालिका रुग्णालयांत व्यवस्थित सुरु झालेले नाही. महिनाभर याबाबतची कल्पना देऊनही पालिका आरोग्य विभागांतील वरिष्ठांकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने अखेरीस सेंट्रल मार्ड या निवासी डॉक्टरांच्या संघटनेने शुक्रवारी रात्री उशिरा बेमुदत संपावर जाण्याचा एकत्रित निर्णय घेतला.
( हेही वाचा: घाटकोपरमध्ये जलवाहिनी फुटल्याने रस्त्याला नदीचे स्वरुप; नागरिकांचे मोठे नुकसान )
निवासी डॉक्टरांच्या मागण्या काय आहेत?
- वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या १ हजार ४३२ जागांची पदनिर्मिती
- शासकीय आणि महाविद्यालात अपुऱ्या आणि मोडकळीस आलेल्या वसतीगृहांमध्ये विद्यार्थ्यांची गैरसोय होते.
- सहयोगी आणि सहाय्यक प्राध्यापकांची पदे तातडीने भरणे.
- महाभाई भत्ता तात्काळ देण्यात यावा.
- वरीष्ठ निवासी डॉक्टरांच्या वेतनातील तफावत दूर करत सर्व निवासी डॉक्टरांना समान वेतन लागू करणे