बारामती येथे एका खाजगी क्लासच्या विद्यार्थिनींच्या सहलीची बस पुलावरून खाली जाऊन झालेल्या अपघातात चालकासह ३ मुली गंभीर, तर २४ मुली आणि क्लासचे कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमारास हा अपघातात झाला. बारामतीमार्गे फलटणच्या दिशेने जाताना समोरून आलेल्या वाहनाला चुकवताना, बसच्या चालकाच्या डोळ्यावर समोर येणाऱ्या वाहनाचा प्रकाश पडल्याने अंदाज आला नाही. त्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
( हेही वाचा: पोलीस शिपाई भरतीच्या मैदानी चाचणीनिमित्त ठाण्यातील वाहतूक मार्गांत बदल; ‘हे’ आहेत पर्यायी मार्ग )
२४ मुली किरकोळ तर ३ मुली गंभीर जखमी
अरुंद रस्त्यामुळे बस थेट ओढ्यात गेली. इचलकरंजी येथील सागर क्लासेस आठवी ते दहावीच्या क्लासमधील मुलींची औरंगाबाद, दौलताबाद, वेरुळ, शिर्डी, शनी शिंगणापूर या ठिकाणी सहलीचे आयोजन करण्यात आले होते. शिर्डीतून माघारी परतत फलटणच्या दिशेने येताना यशोदा ट्रॅव्हल्सची बस बारामती तालुक्यातील पाहुणेवाडी येथील पुलावरून खाली गेली. यात २४ मुली किरकोळ तर ३ मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. सहलीसाठी बसमध्ये एकूण ४८ मुली व ५ क्लासचे कर्मचारी होते. जखमींना स्थानिक रहिवासी आणि पोलिसांच्या मदतीने रुग्णवाहिका बोलावून उपचारासाठी बारामती येथील शासकीय महिला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच सागर क्लासेसच्या बाहेर पालकांनी मोठी गर्दी केली. तर काही विद्यार्थ्यांचे पालक इचलकरंजीतून बारामतीकडे रवानाही झाले.
Join Our WhatsApp Community