एकाच कुटुंबातील चार चिमुरड्यासह २७ वर्षीय महिलेची १९९४ साली हत्या करून फरार झालेल्या खुन्याला मीरा भायंदर गुन्हे शाखेने तब्बल २८वर्षांनी गुरुवारी मुंबई विमानतळावर अटक केली आहे. पाच जणांच्या हत्या केल्यानंतर आरोपी खुनी हा कतार देशात पळून गेला होता आणि तिथेच नोकरी करीत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. राजकुमार चौहान उर्फ काल्या (४८) असे अटक करण्यात आलेल्या खुन्याने नाव आहे. मीरा रोड येथील काशीमीरा येथील पेणकर पाडा या ठिकाणी राहणारा राजकुमार चौहान उर्फ काल्या याने १९९४ साली शेजारीच राहणाऱ्या प्रजापती कुटुंबातील जगरानादेवी प्रजापती (२७ ),प्रमोद प्रजापती (५), मुलगी पिंकी (३),पिंटू (४) आणि ३ महिन्याचा मुलगा या पाच जणांची दोन मित्राच्या मदतीने हत्या केली होती. आरोपी राजकुमार हा १९ वर्षांचा असताना त्याने शेजारी राहणाऱ्या जगरानादेवी प्रजापती हिची छेड काढली होती. जगरानादेवी हिने पती राजाराम याच्याकडे याबाबत तक्रार केली होती.
यादरम्यान राजाराम आणि आरोपी राजकुमार यांच्यात भांडण झाले होते. जगरानादेवीने पतीकडे तक्रार केल्याच्या रागातून राजकुमार याने मित्र अनिल सरोज आणि सुनील सरोज यांच्या मदतीने १६ ऑक्टोबर १९९४ रोजी दुपारच्या सुमारास राजाराम प्रजापती हे घरात नसतांना प्रजापती यांच्या घरात घुसून धारदार शस्त्राने राजाराम प्रजापती यांची पत्नी जगरानादेवी आणि चार चिमुरड्या मुलांची निर्घृणपणे हत्या केली होती. याप्रकरणी काशीमीरा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये संशयित आरोपी म्हणून राजकुमार चौहान उर्फ़ काल्या याचा शोध पोलिसांकडून सुरु होता, परंतु त्याचा कुठेही थांगपत्ता लागत नव्हता. उत्तर प्रदेशात त्याच्या गावी पोलीस जाऊन आले होती, मात्र तिथेही तो सापडला नाही. अनेक वर्ष शोध घेऊनही आरोपी सापडत नसल्यामुळे हा गुन्हा प्रलंबित ठेवण्यात आला होता.
( हेही वाचा: चुकीच्या उपचारांमुळे रुग्णाला गमवावे लागले प्राण, बोगस डॉक्टर दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल )
प्रलंबीत गुन्हे निकाली काढताना, गुन्ह्याचा तपासा नव्याने सुरु
नुकतेच पोलिसांनी प्रलंबीत गुन्हे निकाली काढण्याचे ठरवले असताना, सदरचा गुन्हा प्रलंबीत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले आणि पुन्हा नव्याने या गुन्ह्याचा तपास सुरू केला. यासाठी काशिमीरा पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष १ ने महिनाभर जुन्या पोलिसांच्या नोंदीचा अभ्यास केला. यावेळी आरोपी हा मुळ गावच्या पत्यावर न राहता वाराणसी येथे राहत असून, तो परदेशात कतार येथे नोकरी करत आहे. दोन ते तीन वर्षांनी तो भारतात परत येत असल्याचे पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी आरोपी विरोधात २०२१ मध्ये लुकआऊट सरक्युलर जारी केले आणि त्यावर पाळत ठेवली.
आरोपीला ४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी
२९ डिसेंबर रोजी तो भारतात आला असता, मुंबई विमानतळावर या परिपत्रकानुसार त्याला ताब्यात घेण्यात आले. आणि काशिमीरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. अशा पद्धतीने पोलिसांनी २८ वर्षे प्रलंबीत असलेला गुन्हा निकाली काढला. राजकुमार उर्फ काल्या याच्या दोन मित्रांचा शोध पोलीस घेत आहेत. तर अटक केलेल्या आरोपीला ४ जानेवारीपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
Join Our WhatsApp Community