मुंबई महापालिकेच्या शाळांसह शिक्षण कार्यालयांमधील बायोमेट्रीक मशीन्स कोविड काळात बंद करण्यात आल्या असून सध्या हजेरी पुस्तकात हजेरी नोंदवणाऱ्या शिक्षकांसह आता शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी आता बायोमेट्रीक मशीन्स बसवल्या जाणार आहे. यासाठी तब्बल ३६८ मशीन्स खरेदी केल्या जात असून एका बाजूला व्हेरिफाईड फेशियल हजेरीच्या प्रणालीचा अवलंब केला जात असतानाच दुसरीकडे बायोमेट्रीक मशीन्सची खरेदी करत एकप्रकारे महापालिकेने या नवीन हजेरी प्रणालीकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.
( हेही वाचा : उर्दू भाषा भवनाबाबत बाल आयोगाची महापालिकेला नोटीस, दहा दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश )
महापालिकेच्या शाळा आणि शिक्षण विभागाच्या कार्यालयांमध्ये बसवलेल्या बायोमेट्रीक हजेरीच्या देखभालीचे कंत्राट संपुष्टात आला आहे. कोविड काळामध्ये या मशीन्सचा वापर होऊ न शकल्याने सर्व मशीन्स या नादुरुस्त झाल्या आहेत. तसेच याच्या देखभाल दुरुस्तीचे कंत्राटही संपुष्टात आल्याने महापालिकेने यासर्व ठिकाणी नव्याने बायोमेट्रीक मशीन्स खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
यामध्ये महापालिकेच्या शिक्षण विभागांतर्गत १३ विभागातील कार्यालये व शाळांमधील मागणीनुसार या मशीन्सची खरेदी केली जात आहे. यामध्ये भायखळा ई विभाग, वडाळा,शीव एफ उत्तर विभाग, परळ शिवडी या एफ दक्षिण विभाग, वरळी जी दक्षिण विभाग, वांद्रे ते सांताक्रुझ पूर्व या एच पूर्व विभाग, चेंबूर एम पश्चिम विभाग, अंधेरी जोगेश्वरी के पश्चिम विभाग, मालाड पी उत्तर विभाग, कांदिवली आर दक्षिण विभाग, दहिसर आर दक्षिण विभाग, गोवंडी, देवनार या एम पूर्व विभाग व मुलुंड टी विभाग आदी विभागांसाठी सरासरी २० ते २५ मशीन्स याप्रमाणे एकूण २६८ मशीन्सची खरेदी करण्यात येत आहे.
या मशीन्सच्या खरेदीसाठी ओमेक्स कंट्रोल सिस्टीम या कंपनी पात्र ठरली असून या कंपनीकडून १ कोटी २७ लाख १२ हजार रुपयांचा खर्च होणार आहे. एका मशीन्सच्या खरेदीसाठी २९ हजार ७८६ रुपये मोजले जाणार आहे.
Join Our WhatsApp Community