काश्मिरी पोलिसांसाठी वर्ष २०२२ गेले शांतीपूर्ण; २०२३ चे लक्ष्य काय असणार?

193

2022 च्या अखेरीस जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी संपूर्ण वर्षाचा लेखाजोखा मांडला. 2022 हे वर्ष दहशतवादी कारवायांच्या दृष्टिकोनातून अतिशय शांततेत गेल्याचे सांगितले. आता 2023 वर्षात  पोलिसांचे ‘मिशन झिरो टेरर’चे लक्ष्य आहे. यासाठी दहशतवादी नेटवर्क नष्ट करणे याला प्राधान्य असणार आहे, असे महासंचालक दिलबाग सिंह म्हणाले.  गेल्या 12 महिन्यांत नवीन दहशतवाद्यांच्या भरतीमध्ये मोठी घट झाली आहे. यासोबतच त्यांनी सुरक्षा दलांच्या जीवित आणि मालमत्तेच्या नुकसानीत लक्षणीय घट झाल्याची माहिती दिली. 2022 मध्येच लष्कर आणि जैशच्या 56 सह 186 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. 4 ते 5 दहशतवाद्यांसह बनवलेले एकूण 146 दहशतवादी गटांचा खात्मा करण्यात आला. याशिवाय 159 दहशतवाद्यांनाही अटक करण्यात आली.

किती नवीन दहशतवादी तयार झाले? 

दहशतवाद्यांच्या नव्या भरतीची आकडेवारी सादर करताना दिलबाग सिंग म्हणाले की, 2022 मध्ये एकूण 100 नवीन दहशतवाद्यांनी देशाविरुद्ध शस्त्रे हाती घेतली. ही संख्या 2021 च्या तुलनेत 37% कमी असल्याचे म्हटले आहे. 2022 मध्ये तयार झालेल्या 100 नवीन दहशतवाद्यांपैकी 17 जणांना अटक करण्यात आली तर 18 चा शोध सुरू आहे. उर्वरित 65 दहशतवादी वेगवेगळ्या चकमकीत ठार झाले आहेत. मोठ्या संख्येने काश्मिरी तरुणांनी दहशतवादाचा मार्ग सोडून सन्मानपूर्वक जीवन जगण्याची शपथ घेतल्याचा दावाही डीजीपी दिलबाग यांनी केला आहे. 2022 मध्ये 14 पोलिस कर्मचारी आणि 17 निमलष्करी दलाचे जवान हुतात्मा झाले. स्वातंत्र्यानंतर काश्मीरच्या इतिहासात ही संख्या सर्वात कमी आहे. त्याच वेळी, दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्या एकूण नागरिकांची संख्या 24 असल्याचे सांगण्यात आले. दिलबाग सिंग यांनीही ही संख्या काश्मीरच्या इतिहासातील सर्वात कमी असल्याचे सांगितले आहे. काश्मीर पोलिसांनी 2022 मध्ये 55 वाहने आणि 28 घरे जप्त केली. त्यांचा वापर दहशतवादी कारवाया करण्यासाठी केला जात होता. दहशतवादात वापरल्या जाणाऱ्या शस्त्रास्त्रांच्या आकडेवारीचीही माहिती डीजीपींनी दिली. 2022 मध्ये एकूण 188 घातक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. यामध्ये AK-47 चाही समावेश आहे. याशिवाय 275 पिस्तूल, 354 ग्रेनेड आणि 61 आयईडी जप्त करण्यात आले आहेत. जप्त करण्यात आलेल्या शस्त्रास्त्रांमध्ये ड्रोनमधून टाकण्यात आलेल्या अनेक शस्त्रास्त्रांचा समावेश आहे. जम्मू-काश्मीरच्या पोलीस महासंचालकांच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी खोऱ्यातील ड्रग्ज रॅकेटवरही जोरदार कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान एनडीपीएसचे १६९३ गुन्हे दाखल करण्यात आले. या वर्षी 212 किलो हेरॉईन, 383 किलो चरस, 12 किलो ब्राऊन शुगर आणि 10,000 किलो खसखस यासह इतर अमली पदार्थ जप्त करण्यात आले.  2022 मध्ये काश्मीर पोलिसांनी एकूण 29,834 एफआयआर नोंदवले आहेत. यामध्ये 2,285 प्रकरणे महिलांवरील गुन्ह्यांशी संबंधित आहेत. याशिवाय अवैध कामांबाबत १,३५० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

(हेही वाचा मोठी बातमी! नाशिकच्या जिंदाल कंपनीत बाॅयलरचा स्फोट; 100 पेक्षा जास्त लोक अडकले)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.