महागाई भत्ता, सहयोगी प्राध्यापकांची रिक्त पदे भरणे, वसतीगृहाच्या समस्या, मुंबई महानगरपालिकेकडून दर महिना मिळणारा प्रलंबित कोविड भत्ता या कारणांमुळे राज्यभरात सोमवार, 2 जानेवारीपासून सात हजार निवासी डॉक्टर्स बेमुदत संपावर जाणार आहेत. या काळात केवळ अत्यावश्यक सेवांसाठी निवासी डॉक्टर्स कामावर रुजू राहतील. मागण्या केवळ वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी अद्यापही निर्णय घेतलेला नसल्याने संप अटळ असल्याची माहिती सेंट्रल मार्ड या निवासी डॉक्टरांच्या संघटनेने दिली. मुंबई महानगरपालिकेतील निवासी डॉक्टर्स आणि परिचारिकाही सोमवारी संपावर जाणार आहेत. त्यामुळे मुंबईत रुग्णसेवा मोठ्या प्रमाणात खोळंबली जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कोणत्या मागण्यांसाठी होणार संप
पालिका मार्ड संघटनेनेही बेमुदत संपाची हाक पुकारली आहे. पालिका सहआयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी अद्यापही पालिका मार्डसोबत बैठक घेतलेली नाही. त्यामुळे प्रलंबित कोविड भत्त्याचा प्रश्न सहज सुटणारा नाही, अशी कल्पना वरिष्ठांकडून पालिका मार्डच्या सदस्यांना दिली गेलेली नाही. यंदाच्या वर्षात नव्याने प्रवेश घेणा-या डॉक्टरांसाठी वसतीगृहात जागा नाही. एका खोलीत पाच डॉक्टर्स कसेबसे राहत आहेत. जागा अपुरी पडत असताना नव्या एमबीबीएस प्रवेशातील विद्यार्थ्यांचा राहण्याचा मोठा प्रश्न उभा राहतोय, अशी माहिती पालिका मार्डच्या सदस्यांनी दिली. अद्यापही आम्हांला सोमवारी सकाळी बैठकीसाठी पालिका सहआयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्याकडून बोलावणे आलेले नाही. परिणामी, संप पालिका तसेच राज्यभरातील सरकारी रुग्णालयांत अटळ असल्याची माहिती मार्डच्या सदस्यांनी दिली.
(हेही वाचा धक्कादायक! पुरातत्व विभागाच्या नियंत्रणाखालील देशातील 50 राष्ट्रीय स्मारके गायब!)
पालिका रुग्णालयातील साडेतीन हजार परिचारिकांचा एकदिवसीय संप
पालिका रुग्णालयात केईएम, सायन, कूपर आणि नायर रुग्णालयातील परिचारिका वगळता इतर रुग्णालयांतील साडेतीन हजार परिचारिका एक दिवसीय संपात सहभागी होतील. दर महिन्याला आठ दिवसांची रजा मिळण्यासाठी एकदिवसीय संप परिचारिकांनी पुकारला आहे. यासह पालिका प्रसूतीगृहातील परिचारिकाही एक दिवसीय संपात सहभागी होणार आहे. गोवंडीतील चिता कॅम्प, चर्नीरोड येथील जाबावाडी, विक्रोळी येथील टागोर नगर येथील परिचारिकांनाही एक दिवसीय संपात सहभाग नोंदवला आहे. सोमवारी इतर प्रसूतीगृहातून संपात सहभागी झालेल्या परिचारिकांची माहिती मिळेल, अशी माहिती मुंबई महानगरपालिका परिचारिका संघटनेच्यावतीने दिली गेली.
Join Our WhatsApp Community