वर्ष २०२३ च्या बजेटमध्ये भारताच्या संरक्षण क्षेत्रात आर्थिक तरतूद वाढवण्याची गरज

141

२०२२ मध्ये चीन आणि पाकिस्तानने भारतावर अनेकदा कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. आता २०२३ मध्ये पाकिस्तानचे पंजाब, कश्मीर खोऱ्यात दहशतवाद पुनर्जिवीत करण्याचे लक्ष्य आहे. त्यामुळे पाकिस्तानकडून होणारी दहशतवाद्यांची घुसखोरी रोखण्याचे आव्हान भारतासमोर आहे.

अंमली पदार्थांचा दहशतवाद

पाकिस्तान मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ भारताच्या पंजाब प्रांतात पाठवत आहे. २०२२ मध्ये समोर आलेल्या आकडेवारीनुसार, २८० पेक्षा अधिक वेळा ड्रोनद्वारे अंमली पदार्थ पंजाब प्रांतात आले आहेत. त्यातील केवळ ८ ड्रोन पाडण्यात भारताला यश आले. अंमली पदार्थांचा दहशतवाद मोठ्या प्रमाणात पंजाब प्रांतात पसरल्याचे दिसते. पंजाबमधील ५० टक्के युवक अंमली पदार्थांच्या आहारी गेले आहेत. पंजाबला खरोखरच उडता पंजाब बनवण्याचा पाकिस्तानचा डाव आहे. हा डाव उधळून लावण्यासाठी बाॅर्डर सिक्यूरिटी फोर्स (BSF)च्या जवानांना अधिक सतर्क राहावे लागणार आहे. तसेच, हे ड्रोन्स पाडण्यासाठी अॅंन्टी ड्रोन्स वेपन्सचा वापर करावा लागेल. या शस्त्रास्त्रांची संख्यादेखील वाढवावी लागणार आहे.

(हेही वाचा #BOYCOTTSonyTV ट्रेंड सुरु; ‘सोनी’च्या ‘क्राईम पेट्रोल’मध्ये आफताब बनला हिंदू, श्रद्धा बनली ख्रिश्चन)

सागरी सुरक्षा अधिक मजबूत करण्याची गरज

समुद्र किनाऱ्यांवरुन दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता फारच कमी आहे. परंतु सागरी किनाऱ्यांवरुन बेकायदेशीरपणे अंमली पदार्थांचा व्यापार केला जातो. अरबी समुद्राच्या पश्चिम किनारपट्टीवर जवळजवळ ६ हजार कोटींचे ड्रग्ज २०२२ मध्ये पकडण्यात आले. तसेच, शस्त्रसाठादेखील जप्त करण्यात आला होता. त्यामुळे या नवीन वर्षात भारताला आपली सागरी सुरक्षा अधिक मजबूत करण्यावर भर द्यावा लागणार आहे. भारताची सागरी सुरक्षा ही त्रिस्तरीय आहे. किनारपट्टीपासून २० नाॅटिकल माईलपर्यंत समुद्राचे संरक्षण सागरी पोलीस करतात. २० नाॅटिकल माईलपासून २०० नाॅटिकल माईलपर्यंतच्या समुद्राचे संरक्षण भारतीय तटरक्षक दल करते आणि त्यापुढील समुद्राची पाहणी भारतीय नौदल करते. भारतीय नौदल आणि सागारी पोलिसांना हा बेकायदेशीर व्यापार, तस्करी, थांबवण्यात फारसे यश आलेले दिसत नाही. त्यामुळे भारतीय नौदल आणि पोलिसांना अधिक गस्त, टेहाळणी करुन हा व्यापार थांबवावा लागणार आहे. यात चांगली कामगिरी तटरक्षक दलाची आहे. २०२२ मध्ये तटरक्षक दलाने ७ ते ८ वेळा इंटेलिजेन्स आधारित ऑपरेशन करुन मोठ्या प्रमाणात ड्रग्ज पकडले. अशीच कामगिरी तटरक्षक दलाला या नव्या वर्षातही करावी लागणार आहे.

चीनचे हायब्रीड वाॅर

चीनमध्ये भारताशी पारंपरिक युद्ध करण्याची क्षमता आहे, परंतु चीनसारखा धूर्त देश तसे न करता पाकिस्तानला मदत करुन ईशान्य भारतात दहशतवाद वाढवण्याचा प्रयत्न करेल. तसेच, भारताच्या आर्थिक क्षेत्रात घुसखोरी करुन, आर्थिक क्षेत्र कमकुवत करण्याचा प्रयत्न करेल. तसेच, चीन मोठा सायबर अ‍ॅटॅकही करु शकतो. (उदा. ऑल इंडिया इन्सिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सवर झालेला सायबर अटॅक). तसेच, चीन २०२३ मध्ये भारताविरुद्ध ‘अपप्रचार युद्ध’ अधिक तीव्र करण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारताला पारंपरिक युद्धापेक्षा चीनी हायब्रीड वाॅरला प्रत्युत्तर देण्याची क्षमता वाढवावी लागेल, आपले सायबर डिफेन्स मजबूत करावे लागेल.

(हेही वाचा काश्मिरी पोलिसांसाठी वर्ष २०२२ गेले शांतीपूर्ण; २०२३ चे लक्ष्य काय असणार?)

आधुनिक शस्त्रास्त्रे खरेदी करण्याची गरज

भारताला चीननजीक सीमांवर दळणवळणासाठी सुविधा अधिक मजबूत करणे गरजेचे आहे. सध्या भारत एक समांतर रस्ता तयार करत आहे, जो चीन सीमेला अरुणाचल प्रदेशमध्ये समांतर असणार आहे. त्यामुळे भारतीय सैन्याला गस्त घालणे सोपे होणार आहे. असेच अनेक रस्ते भारताला येत्या दोन वर्षांत बांधून पूर्ण करणे गरजेचे आहे. चीनी घुसखोरी थांबवण्यासाठी भारत-चीन सीमांलगत रडार, सॅटेलाईट तसेच, ड्रोन्स लावणे या सर्व बाबींवर लक्ष घालणे गरजेचे आहे. यातील सर्वात महत्त्वाची गरज आहे ती म्हणजे भारताचे डीफेन्स बजेट. भारताला सीमांलगत आधुनिक सुविधा निर्माण करण्यासाठी डिफेन्स बजेट वाढवावे लागेल. येत्या फेब्रुवारी महिन्यात सादर होणाऱ्या बजेटमध्ये ३० ते ४० टक्के बजेट वाढवणे गरजेचे आहे. भारताच्या संरक्षण दलात अनेक शस्त्रे, ड्रोन्स, सायबर डिफेन्स, स्पेस वाॅर भेदण्याची गरज आहे. त्यामुळे भारताला आपले बजेट वाढवणे गरजेचे आहे. चीनसोबत पारंपरिक युद्ध होण्याची शक्यता नसली तरी, भारताची जूनी झालेली शस्त्रास्त्रे ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत आधुनिक करण्याची गरज आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत तयार करण्यात आलेल्या आधुनिक तोफा, रणगाडे भारतीय लष्कराने मंजूर केले आहेत. तरीसुद्धा पैशांअभावी भारतीय सैन्यदल ते घेऊ शकत नाहीत. त्यामुळे नवीन रणगाडे, तोफा, रडार, सॅटेलाईट घेण्यासाठी बजेट वाढवणे गरजेचे आहे. सैन्याचे आधुनिकीकरण झाले तर भारत चीनशी होणाऱ्या कोणत्याही युद्धाचा मुकाबला करण्यासाठी अजून सक्षम होईल.

भारताला टू फ्रंट वाॅरसाठी सज्ज राहणे गरजेचे

भारत-चीन युद्ध जर झाले तर पाकिस्तानही भारतावर चाल करु शकतो. त्यामुळे जनरल बिपीन रावत यांनी सांगितल्याप्रमाणे, भारताला टू फ्रंट वाॅरसाठी सज्ज राहावे लागणार आहे. सोबतच अंतर्गत सुरक्षिततेच्या आव्हानांनादेखील तोंड देऊन, त्यांचे कंबरडं मोडायचं आहे. थोडक्यात २०२३ मध्ये भारताला चीन-पाकिस्तानकडून येणाऱ्या अनेक आव्हानांशी सामना करावा लागणार आहे. त्यात महत्त्वाचे म्हणजे भारतात होणारी बांग्लादेशींची घुसखोरी. ही घुसखोरी सुरुच राहणार आहे. त्यामुळे बीएसएफला अजून सक्षम करणे गरजेचे आहे.

लेखक – ब्रिगेडियर हेमंत महाजन, स्वातंत्र्यवीर सावरकर स्ट्रॅटेजिक सेंटरचे मानद संचालक.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.