पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आखून दिलेले ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने आर्थिक सल्लागार परिषदेची स्थापना केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात त्यासंबंधीची घोषणा केली. या आर्थिक सल्लागार परिषदेत उद्योगपती गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांच्या मुलांना स्थान देण्यात आले आहे. नियोजन विभागाने जारी केलेल्या परिपत्रकातून ही माहिती समोर आली आहे.
( हेही वाचा : …तर महापालिकेतील पक्ष कार्यालयांना वाळवी?)
ही आर्थिक सल्लागार परिषद राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलीयन डॉलर बनविण्यासाठी महत्वाची भूमिका बजावेल. या परिषदेतर्फे विविध क्षेत्रातील महत्वाचे टप्पे निश्चित केले जातील व धोरणही ठरवण्यात येईल. टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन या परिषदेचे अध्यक्ष असतील व उद्योग, ऊर्जा, बँकिंग, सामाजिक क्षेत्र, नियोजन, अभियांत्रिकी, शिक्षण, कृषी, वस्त्रोद्योग अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा या समितीत समावेश केला जाईल, अशी माहिती विधानसभेत बोलताना फडणवीस यांनी दिली होती.
त्यानुसार, राज्याच्या आर्थिक सल्लागार परिषदेत २१ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यात रिलायन्स इंडस्ट्रीचे कार्यकारी संचालक अनंत अंबानी आणि अदानी पोर्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी करण अदानी यांचा समावेश करण्यात आला आहे. आर्थिक अथवा अन्य मुद्द्यांवर राज्य शासनाला सल्ला देणे, स्थूल अर्थशास्त्रीयदृष्ट्या महत्त्वाच्या मुद्यांचा परामर्श करणे आणि त्यावरील भुमिका राज्य शासनाला सादर करणे, वेळोवेळी राज्य शासनाकडून निर्देशित करण्यात आलेले कार्य/मुद्दे, शाश्वत विकास ध्येये साध्य करण्याच्या दृष्टीने उपाययोजना सूचविणे, सर्व क्षेत्रांमधील महत्वाच्या निर्देशकांचे मापदंड निश्चित करणे, तसेच “१ लाख कोटी डॉलर अर्थव्यवस्था” या उदिष्टाशी संलग्न या क्षेत्रांमधील वाढीसाठी धोरण निश्चित करणे, राज्यातील वेगवेगळ्या भागधारकांबरोबर विस्तृत व सखोल विचार विनिमय करणे, सर्व क्षेत्रांचे सखोल देशांतर्गत उत्पादनामधील त्यांचा वाटा वाढविण्याच्या दृष्टीने धोरणात्मक उपाययोजना सुचविणे, तसेच वर नमूद केलेल्या सर्व बाबींच्या अनुषंगाने आगामी ५ वर्षांसाठीचा नियोजन आराखडा येत्या तीन महिन्यांत राज्य शासनास सादर करणे, ही कामे या सदस्यांवर सोपविण्यात आली आहेत.
सल्लागार परिषदेत कोणाचा समावेश?
एन. चंद्रशेखरन – अध्यक्ष, संजीव मेहता – सदस्य, अमित चंद्रा, विक्रम लिमये, एस.एन सुब्रमण्यम, दिलिप संघवी, श्रीकांत बडवे, अजित रानडे, काकु नखाते, अनिश शाह, बी.के. गोयंका, अनंत अंबानी, करण अदानी, मिलिंद कांबळे, विलास शिंदे, विशाल महादेविया, झिया मोदी, प्रसन्ना देशपांडे, राजगोपाल देवरा, ओ.पी. गुप्ता, हर्षदीप कांबळे
Join Our WhatsApp Community