भारतीय शास्त्रज्ञांनी केलेले संशोधन जगभरासाठी मार्गदर्शक ठरत आहे. भारताने केलेल्या असाधारण कामांची चर्चा आज जगभरात आहे. भविष्यात भारतीय प्रयोगशाळेतील संशोधन जगाच्या गरजा पूर्ण करणार आहे, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. नागपुरात आयोजित 108 व्या इंडियन सायन्स काॅंग्रेसच्या उद्धाटन सोहळ्यात ते बोलत होते. या सोहळ्यात पंतप्रधान व्हर्च्युअली सहभागी झाले होते.
यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे शताब्दी सोहळ्याच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष नितीन गडकरी उपस्थित होते. तसेच, विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि पृथ्वी विज्ञानमंत्री डाॅक्टर जितेंद्र सिंह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु डाॅक्टर सुभाष चौधरी आणि इंडियन सायन्स काॅंग्रेस असोसिएशन ISCA कोलकाताच्या सरचिटणीस डाॅक्टर विजय लक्ष्मी सक्सेना यांची उपस्थिती होती.
( हेही वाचा: औरंगजेबाचे गुणगान गाणाऱ्या जितेंद्र आव्हाडांच्या सुरक्षेत वाढ; गृह विभागाचे आदेश )
…तर येत्या काही वर्षात देश जगाचे मार्गदर्शन करेल
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएचडी मिळवणा-या संशोधकांमध्ये जगात टाॅप तीनमध्ये भारत असल्याचे सांगितले. तसेच, स्टार्टअपमध्येही टाॅप तीनमध्ये भारताचा समावेश आहे. विज्ञानाच्या क्षेत्रातही देशाची गती झपाट्याने वाढली आहे. जगभरातील 130 देशांच्या यादीत 2015 मध्ये 81 व्या क्रमांकावरुन आपला देश 2022 मध्ये 40 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. शास्त्रज्ञांनी तरुणांना संशोधनासाठी प्रोत्साहित करावे. त्यांच्यातील संशोधकाला व्यासपीठ मिळाले तर येत्या काही वर्षात देश जगाचे मार्गदर्शन करणार आहे,असा विश्वासही यावेळी पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.