राहुल गांधी हे २०२४च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील, असा दावा काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी केला आहे. तेव्हापासून देशाच्या राजकारणात चर्चेला उधाण आले आहे. अशा वेळी काँग्रेसचा हा दावा सर्व भाजपविरोधी पक्षांना मान्य आहे का, यावर चर्चा सुरु झाली. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ‘अशी कोणतीही चर्चा भाजपविरोधी पक्षांमध्ये नाही’, असे सांगत त्यांनी काँग्रेसचा हा दावा फेटाळून लावला.
काय म्हणाले शरद पवार?
राहुल गांधी हे लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान पदाचे उमेदवार असावेत, अशी भाजपविरोधी पक्षांमध्ये अजिबात चर्चा नाही. जर अशी चर्चा असती, तर ती आपल्याला ठाऊक झाली असती. कारण या पक्षांच्या गटाची बैठक आपल्याच निवासस्थानी होत असते, असे शरद पवार म्हणाले. पण एक आहे भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधींना उत्तम प्रतिसाद मिळत आहे, असेही शरद पवार म्हणाले. शरद पवार यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेसच्या मनात असलेला पंतप्रधान पदाचा उमेदवार देशभरातील भाजपविरोधी छोट्या-मोठ्या राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांना अमान्य आहे, हे स्पष्ट झाले आहे. सध्या शरद पवार हे काँग्रेस वगळता सर्व भाजपविरोधी पक्षांची तिसरी आघाडी म्हणून मोट बांधत आहेत. त्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे. या तिसऱ्या आघाडीच्या बैठका याआधी झाल्या आहेत.
(हेही वाचा शरद पवारांनी अजित पवारांना सुनावले; म्हणाले…)
काय म्हणाले काँग्रेसचे नेते?
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा जेव्हा मध्य प्रदेशात आली, तेव्हा मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी राहुल गांधी हे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत केवळ विरोधी पक्षाचा चेहरा नसतील, तर पंतप्रधान पदाचे उमेदवारही असतील, असे म्हटले होते. हाच दावा काँग्रेसचे आणखी एक नेते शशी थरूर यांनी केला होता.
Join Our WhatsApp Community