सांगलीच्या आष्टा शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी अखेर परवानगी देण्यात आली आहे. परवानगी नाकारल्यामुळे शिवप्रेमींनी आष्टा, वाळवा बंद ठेवून आंदोलन केले होते. अखेर या आंदोलनाला यश आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला जागेच्या हस्तांतरणाला परवानगी देण्यात आली आहे. यामुळे शिवप्रेमींनी जल्लोष करत बंद मागे घेतला.
पुतळा हटवल्याने शिवप्रेमी आक्रमक
सांगली जिल्ह्यातील आष्टा शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याच्या निषेधार्थ बुधवारी, आष्टा, वाळवा बंदची हाक देण्यात आली होती. आष्टा शहरात शिवरायांचा पुतळा शिवप्रेमींनी गनिमी काव्याने बसवला होता. मात्र, पुतळा बसवण्यासाठी परवानगी नसल्याने पुतळा रात्रीत पोलिसांकडून हटवण्यात आला. यानंतर सांगलीत मोठे पडसाद उमटताना दिसून येत होते.
( हेही वाचा: औरंगजेबाने तोडलेल्या हिंदू मंदिरांची यादी देत, नितेश राणेंनी आव्हाडांचा घेतला समाचार )
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवण्यास शिवप्रेमींचा विरोध होता, तरीदेखील पोलिसांनी पुतळा आणि परिसरामध्ये 144 कलम लागू केले. तसेच, रात्री लाईट बंद करुन महाराजांचा पुतळा हटवला. यामुळे शिवभक्तांनी आष्टासहित वाळवा बंदची बुधवारी हाक दिली होती. आष्टा परिसरात पूर्णता शांतता दिसून येत होती. पुतळा बसवताना पोलीस कुठे होते, याची चौकशी करुन कारवाई होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.