विखे पाटलांनी स्वीकारली ‘नाशिक पदवीधर’ची जबाबदारी; काँग्रेसला टक्कर देण्यासाठी ही खेळी…

183
विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सर्व जागा जिंकण्याचे उद्दिष्ट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरवले आहे. त्याची पूर्तता करण्यासाठी फडणवीसांनी आपले शिलेदार मैदानात उतरवले असून, सर्वात कठीण अशा नाशिक पदवीधर मतदारसंघाची जबाबदारी महसूलमंत्री विखे पाटील यांनी स्वीकारली आहे.
विधानपरिषदेत आपला सभापती बसवण्यासाठी शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या सर्व जागा जिंकण्याचे आव्हान भाजपापुढे आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी या निवडणुकीची संपूर्ण धुरा स्वतःच्या हाती घेतली असून, निवडक सहकाऱ्यांसोबत मायक्रो प्लानिंग सुरू केले आहे. महाविकास आघाडीला तगडे आव्हान देऊ शकतील अशा उमेदवारांचा शोध त्यांच्याकडून सुरू आहे. अशावेळी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघात भाजपाचा उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी स्वतः विखे पाटलांनी स्वीकारल्यामुळे फडणवीसांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
नाशिक पदवीधर मतदार संघ एकेकाळी भाजपचा बालेकिल्ला मानला होता. मात्र, २००९ पासून कॉंग्रेसच्या सुधीर तांबे यांनी सलग तीन वेळा भाजपाच्या उमेदवाराला पराभूत करून स्वतःची पकड मजबूत केली आहे. अगदी मोदी लाटेतही त्यांनी विजयश्रीला गवसणी घातली. त्यामुळे यावेळी त्यांना रोखण्यासाठी भाजपाकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे धाकटे बंधू डॉ. राजेंद्र विखे पाटील यांना संधी देण्याचे जवळपास निश्चित झाल्याचे कळते.

चार जिल्ह्यांचा एक मतदारसंघ

नाशिक पदवीधर मतदार संघात जळगाव, धुळे, नाशिक, नंदूरबार आणि अहमदनगर या चार जिल्ह्यांचा समावेश होतो. या मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली असून, १२ जानेवारीला उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. कॉंग्रेसतर्फे विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली जाणार आहे. त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेचाही पाठींबा मिळणार असल्यामुळे भाजपासमोर तगडे आव्हान असणार आहे.

आजी-माजी महसूलमंत्र्यांत लढत

  • डॉ. राजेद्र विखे पाटील हे राजकारणात सक्रिय नाहीत. ते प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती तथा प्रवरा मेडिकल ट्रस्टचे अध्यक्ष आहेत.
  • त्यांना उमेदवारी मिळाल्यास ही निवडणूक नगर जिल्हा केंद्रीत होवून कॉंगेसचे बाळासाहेब थोरात विरुद्ध राधाकृष्ण विखे पाटील अशी लढत होईल.
  • कारण डॉ. सुधीर तांबे हे बाळासाहेब थोरात याचे मेव्हणे आहेत.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.