राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा टोला

173
एकीकडे शरद पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना स्वराज्यरक्षक आणि धर्मवीर असेच म्हणायला हवे, असे म्हटले. पण अजित पवार म्हणतात धर्मवीर म्हणायचे नाही, यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता दोन गट पडले आहेत. एक शरद पवार यांचा एक गट आणि अजित पवार यांचा वेगळा गट, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हाणला.
ज्या औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज यांना धर्म परिवर्तन करण्यासाठी एक महिना आतोनात यातना दिल्या, तरीही त्यांनी धर्म बदलला नाही, मग त्यांना धर्मवीर ही पदवी तुम्ही-आम्ही दिली आहे का? वर्षानुवर्षे त्यांना ही उपाधी मिळाली आहे, ते धर्मवीरच आहेत, पण अजित पवार यांचे वक्तव्य निंदाजनक आहे, ते जसे राष्ट्रपुरुषांचा अपमान करणाऱ्यांनी माफी मागावी, अशी मागणी करतात, तसे त्यांनीही त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागितली पाहिजे. आता औरंगजेबाचे उदात्तीकरण केले जात आहे. त्यांना शिवप्रेमी जनता धडा शिकवेल, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

लोकसभेत आमची युती सर्व जागा जिंकणार! 

भाजपसोबतचे युतीचे सरकार लोकसभा निवडणुकीत सगळ्या जागा जिंकणार, तसेच विधानसभा निवडणुकीत २०० जागा जिंकणार असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. भाजपसोबत आठवले आहेत आणि आमच्यासोबत कवाडे आहेत, आमची युती भक्कम आहे. प्रकाश आंबेडकर यांनाही आपण भेटलो होतो, पण ती भेट राजकीय नव्हती, इंदू मिलमधील स्मारकाविषयी चर्चा झाली. ते माझे चांगले मित्र आहेत. त्यामुळे प्रकाश आंबेडकर हे ठाकरे गटासोबत गेले हा त्यांचा अधिकार आहे. लोकशाहीत हे स्वातंत्र्य आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

विद्युत क्षेत्रात संप करणे चुकीचे! 

विद्युत क्षेत्रात कोणताही निर्णय घेतला नसताना वीज कर्मचाऱ्यांनी संप सुरु केला. ही सेवा अत्यावश्यक सेवेत येते. त्यामुळे लोकांची गैरसोय होते, असे आंदोलन करणे योग्य नाही. तरीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ऊर्जामंत्री हे वीज कर्मचाऱ्यांशी चर्चा करत आहेत, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.