अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येचे प्रकरण अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक भारत या वाहिनीने लावून धरले असून, पुछता है भारत या अर्णब गोस्वामी यांच्या डिबेट शो मधून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सवाल विचारले जात आहे. यावेळी एका डिबेट दरम्यान अर्णब गोस्वामी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला. मात्र या सर्व प्रकारानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना फोन केल्याचे राऊत यांनी आजच्या रोखठोकमध्ये म्हटले आहे. शरद पवार एका मुख्यमंत्र्याचा असा एकेरी उल्लेख होणे, बरोबर नाही, असे म्हटले आहे.
काय आहे रोखठोकमध्ये
सुशांत सिंह राजपूत या अभिनेत्याने आत्महत्या केली असे सकृत्दर्शनी दिसते. हा खून आहे असे जे वारंवार सांगितले जाते त्यास तसा आधार नाही. अभिनेत्याचा खून घडवून आणला व त्यात सिनेसृष्टी व राजकीय नेत्यांचे संगनमत आहे, असे ओरडून सांगणे हा तापलेल्या पोळ्या भाजू इच्छिणाऱ्या गटारी पत्रांचा व वृत्तवाहिन्यांचा प्रचार साफ खोटा होता. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार आहे. ते कसेही करून पाहायचे. पडत नाही म्हटल्यावर बदनाम करायचे असे विरोधकांनी ठरवले व भारतीय जनता पक्षाच्या सर्वच प्रकारच्या पाठिंब्यावर उभ्या राहिलेल्या वृत्तवाहिनीतून त्यांनी सुशांत प्रकरणात आघाडी उघडली. त्या वृत्तवाहिनीच्या प्रमुखाने केले ते ‘गॉसिपिंग’! लोकांच्या मनातील संशय वाढवला. अर्णब गोस्वामी हे रिपब्लिक वृत्तवाहिनीचे प्रमुख. ते राजकीय नेत्यांचा, मुख्यमंत्र्यांचा सरळ एकेरी भाषेत उल्लेख करतात, बदनामीकारक भाषा वापरतात, धमक्या देतात. सोनिया गांधींच्या बाबतीत त्यांनी हेच केले व आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी भाषेत उल्लेख करून आव्हानाची भाषा करतानाही त्यांना लोकांनी पाहिले. हे सर्व पाहिल्यावर शरद पवार यांनी मला फोन केला, “एका वृत्तवाहिनीवर उद्धव ठाकरे यांचा उल्लेख एकेरी भाषेत होतोय. हे बरोबर नाही. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री ही फक्त एक व्यक्ती नसते, तर संस्था असते.” ‘Institute’ असा उल्लेख त्यांनी केला. शेवटी त्यांनी प्रश्न केला, “मग सरकार काय करते?” पवार यांचे मत एका अनुभवी नेत्याचे मत आहे. पत्रकारितेचे हे चित्र चांगले नाही. एक वृत्तवाहिनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर एकेरी भाषेत गरळ ओकते व ते सहन केले जाते. त्या वृत्तवाहिनीस महाराष्ट्रातील राजकीय पक्ष बळ देतात. सुशांत सिंह हे निमित्त व त्या निमित्ताने सरकार बदनाम करायचे हे मुख्य कारस्थान. ते सुरूच आहे असे देखील ते म्हणालेत.
Join Our WhatsApp Community