वसतीगृहांची डागडुजी, महागाई भत्ता, कोविड भत्त्यासाठी मुंबईतील पालिका तसेच राज्यातील सरकारी रुग्णालयांतील निवासी डॉक्टरांनी बेमुदत संप पुकारला, मात्र ५० टक्क्यांहून अधिक डॉक्टर संपात सहभागी झाले नव्हते. त्यामुळे संपातील दोन दिवसांत मुंबईत रुग्ण सेवेवर फारसा परिणाम झाला नाही. अत्यावश्यक सेवेत डॉक्टरांचा सहभाग दिसून आला.
सूत्रांच्या माहितीनुसार, संभाषणाच्या अभावी मुंबईतील प्रत्येक रुग्णालयातील निवासी डॉक्टर्स संपात सहभागी झाले नाही. केवळ एकाच गटातून संप पुकारला गेल्याने प्रत्यक्षात सर्वच पालिका आणि सरकारी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी संपात सहभाग घेतला नाही. पालिका रुग्णालयांतील केईएम, कूपर तसेच नायर या तीन प्रमुख रुग्णालयांत निवासी डॉक्टर्स ब-यापैकी रुग्णसेवेसाठी कामावर होते. त्यातुलनेत टिळक रुग्णालयात निवासी डॉक्टर्स ब-यापैकी कामावर गैरहजर राहिले.
दोन्ही दिवस केवळ नियोजित शस्त्रक्रिया वगळता सर्व कामे व्यवस्थित सुरु राहिली. आपत्कालीन ५० टक्के शस्त्रक्रिया पूर्ण केल्या गेल्या. केईएम रुग्णालयात मंगळवारी ५० टक्क्यांहून अधिक शस्त्रक्रिया झाल्या. केवळ मंगळवारी टिळक रुग्णालयात ८ नव्या रुग्णांना केसपेपर मिळाले.
(हेही वाचा मी कुठं सांगितले माझ्या काकाला ‘जाणता राजा’ म्हणा; अजित पवारांचा शरद पवारांना टोला)
नायर रुग्णालयातील प्रलंबित कोविड भत्त्याच्या मुद्द्यावरुन ‘पालिका मार्ड’ने सरकारी रुग्णालयांत काम करण-या निवासी डॉक्टरांच्या ‘सेंट्रल मार्ड’च्या संघटनेसह बेमुदत संप पुकारला होता. मात्र नायरमध्येही ८० टक्के निवासी डॉक्टर्स कामावर हजर होते, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून दिली गेली.
संपकाळात डॉक्टरांच्या उपस्थितीची काय आहे आकडेवारी?
- नायर रुग्णालय – ८० टक्क्यांहून अधिक निवासी डॉक्टर्स हजर
- केईएम रुग्णालय – १ हजार ५० पैकी केवळ ५५० निवासी डॉक्टर्स संपात सहभागी
- टिळक रुग्णालय – २६६ पैकी १९० निवासी डॉक्टर्स संपात सहभागी
- कूपर रुग्णालय – २०१ पैकी २५ निवासी डॉक्टर्स संपात सहभागी