बाळासाहेबांची शिवसेना! पण ना शाखा,ना शिवसैनिक…

142

आगामी महापालिका निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना पक्ष भाजपसोबत युतीत निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट आहे. परंतु शिवसेनेतून फुटल्यानंतर नव्याने स्थापन झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला अजून तरी मुंबईत काही हातपाय परसरता आलेले नाही. शिंदे यांच्यासोबत गेलेले दोन खासदार, पाच आमदार आणि चार – पाच नगरसेवक हे पदाधिकारी असले तरीही यांच्या व्यतिरिक्त बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला कुठेही शाखा उघडता आल्या नाहीत. त्यामुळे नाव बाळासाहेबांची शिवसेना, पण मुंबईत या पक्षाच्या शाखा ना शिवसैनिक असेच असेच दिसून येते.

( हेही वाचा : केईएममध्ये उतीपेशी बँक सुरु… )

शिवसेना पक्षातून फुटून एकनाथ शिंदे यांनी मुंबईसह राज्यातील ४० आमदार,१३ खासदार आणि नगरसेवकांच्या मदतीने बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची स्थापना केली. राज्यात भाजपसोबत सरकार स्थापन केले आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले.पण राज्यात सरकारात आलेल्या या पक्षाला आपल्या पक्षाचा विस्तार करता आलेला नाही. खासदार राहुल शेवाळे,गजानन कीर्तिकर तसेच आमदार प्रकाश सुर्वे, सदा सरवणकर, यामिनी जाधव, मंगेश कुडाळकर, दिलीप लांडे हे पाच आमदार त्यांच्यासोबत असले तरी या व्यतिरिक्त या पक्षाला आपल्या शाखाही उघडता आलेल्या नाही.

शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षात सामील झालेल्या खासदार,आमदार आणि नगरसेवक आदींनी पक्षाच्या शाखा उघडल्या असल्या तरीही आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्याप्रकारे या पक्षाची संघटनात्मक बांधणी आवश्यक आहे त्याप्रमाणे शाखा स्थापन केल्या जात नाही. या पक्षाची संघटनात्मक पदनिर्मिती आणि पदांवरील व्यक्तींची नेमणूक तथा नियुक्तीही करण्यात आलेली नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीला सामोरे जाताना या पक्षासमोर अनंत अडचणी उभ्या आहेत. भाजपसोबत युती केल्याचा फायदा या पक्षाला मिळणार असला तरीही बाळासाहेबांची शिवसेना म्हणून मुंबईत या पक्षाला उभे राहता येत नाही.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसमोर आव्हान निर्माण करण्यासाठी २२७ शाखा नाही, पण जिथे भाजपचे नगरसेवक नाही त्या प्रभागात तरी शाखा उभारणे आवश्यक आहे. किमान शिवसेनेचे जे ९७ नगरसेवक आहेत, त्यातील काही प्रभाग वगळता ९० प्रभागांमध्ये आपल्या शाखा निर्माण करणे आवश्यक आहे, त्याही उभारता येत नाही. पक्ष वाढीच्या दृष्टिकोनातून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाचे नेते काम करताना दिसत नाही. एका बाजूला उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा उपनगराच्या भाजप पक्षाला कशाप्रकारे जास्त फायदा होईल आणि आपल्या पक्षाचे जास्त नगरसेवक कशाप्रकारे निवडून येतील यासाठी प्रयत्नशील आहेत. तर दुसरीकडे शहराचे पालकमंत्री असलेले दीपक केसरकर हे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला किती फायदा होईल या दृष्टीकोनातून काम करताना दिसत नाही. मुंबईचे सुशोभीकरण प्रकल्प आणि रस्त्यांची कामे या दोन कामांच्या आधारे आपण मुंबईच्या विकास करत आहोत असा दावा मुख्यमंत्री करत आहेत. पण ही कामे केवळ तात्पुरती स्वरूपाची असल्याने मुंबईकरांच्या पचनी पडताना दिसत नाही. मुळात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची स्थापना झाल्यानंतर प्रत्येक प्रभाग निहाय शिवसेना शाखा निर्माण करणे आवश्यक होते. परंतु या पक्षाकडून कार्यकर्ता निर्माण करणे, लोकांना भेटता यावे यासाठी शाखा निर्माण करता आलेल्या नाहीत. एकनाथ शिंदे हे सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री हे केवळ आपण किती चांगले काम करतो आहोत हे दाखवण्याच्या प्रयत्नात संघटनात्मक बांधणीकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते आणि याचा परिणाम आगामी महापालिका निवडणुकीत दिसून येण्याची भीती वर्तवली जात आहे. उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेला आव्हान देण्यासाठी आणि भविष्यात बाळासाहेबांच्या शिवसेनेला मजबूत उभे करण्यासाठी शिवसैनिकांची मोठी फौज निर्माण करून शाखांची उभारणी करणे आवश्यक आहे. परंतु ज्याप्रकारे बाळासाहेबांच्या शिवसेनेने संघटनात्मक बांधणीसाठी ज्याप्रकारे दोन खासदारांसह शहराचे पालकमंत्री आणि दोन उपनेत्यांसह एका माजी नगरसेविकेचा सामावेश केला असला तरी पक्षांतील अंतर्गत विश्वासाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.