राज्यात १२२ नवीन क्रीडा संकुले उभारणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

142

पुणे- महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत दीडशेहून अधिक क्रीडा संकुले उभारण्यात आली आहेत. राज्यातील ग्रामीण भागात आणखी १२२ संकुलांची उभारणी नव्याने करण्यात येईल, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

श्री शिवछत्रपती क्रीडा नगरीत आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे क्रीडा व युवक मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते अजित पवार, राज्याचे क्रीडा व युवक खात्याचे सचिव रणजीत सिंह देओल, पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव, क्रीडायुक्त डॉक्टर सुहास दिवसे, महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे महासचिव  नामदेव शिरगावकर हे यावेळी उपस्थित होते.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू होण्यासाठी तालुका, जिल्हा, राज्य व राष्ट्रीय हे टप्पे अतिशय महत्त्वाचे असतात आणि या प्रत्येक टप्प्यावर यश मिळवण्यासाठी खेळाडूंच्या अंगी जिद्द, चिकाटी आणि मेहनत याची नितांत आवश्यकता असते, असे शिंदे यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले,” जागतिक स्तरावर नेमबाजी सुवर्णपदक मिळवणाऱ्या रुद्राक्ष पाटील याला राज्य शासनाने दोन कोटी रुपयांचे पारितोषिक देऊन सन्मानित केले होते. इतर खेळाडूंनी त्याचे अनुकरण करावे. राज्यातील प्रत्येक खेळाडूची सविस्तर माहिती गोळा केली जात असून त्यामुळे खेळाडूची वेळोवेळी प्रगती कशी होत आहे याची माहिती शासनाला त्वरित मिळेल आणि त्याप्रमाणे शासनाकडून त्याला योग्य ती मदत करणे सोपे जाईल.

 फडणवीस यांनी सांगितले, नीरज चोप्रा याने टोकियो ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा अभिमान वाढवला आहे आणि देशातील नागरिकांना देशभक्तीची काय ताकद असते याची जाणीव करून दिली आहे. त्याचा वारसदार होण्यासाठी महाराष्ट्रातील खेळाडूंनी प्रयत्न करावेत. आपल्या राज्यातील खेळाडूंना चांगल्या दर्जाचे प्रशिक्षण मिळावे यासाठी परदेशी प्रशिक्षकांची आवश्यकता असेल तर त्यासाठी शासनातर्फे सर्व मदत केली जाईल. गेल्या पाच वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली क्रीडा क्षेत्रात अतिशय सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. क्रीडा विकासाकरता केंद्र व राज्य शासन सतत सहकार्य करीत आहे‌. आता खेळाडूंनी त्याचा फायदा घेत महाराष्ट्राचे नाव जागतिक स्तरावर कसे उंचावले जाईल याचा ध्यास घेतला पाहिजे.

ऑलिंपिक भवन उभारण्याचा प्रश्न लवकरच मार्गी लावला जाईल असे आश्वासन देत  महाजन म्हणाले, महाराष्ट्रात जागतिक दर्जाच्या क्रीडा सुविधा निर्माण करण्यासाठी आमचे शासन कटिबद्ध आहे. तालुका स्तरावरील क्रीडा संकुलांकरिता पाच कोटी, जिल्हा स्तरावरील संकुलासाठी २५ कोटी तर राज्यस्तरीय आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा संकुलांकरिता पन्नास कोटी रुपयांची मदत देण्याचे आम्ही यापूर्वी जाहीर केले आहे. राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंना प्रवासाचा त्रास होऊ नये यादृष्टीने आम्ही विमानाने प्रवास करण्याची संधी दिली होती. राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सुवर्ण, रौप्य व ब्रॉंझ पदक मिळवणाऱ्या खेळाडूंना अनुक्रमे ५० लाख, ३० लाख व २० लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. राज्य ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा दर दोन वर्षांनी घेतल्या जातील याची मी ग्वाही देतो.

( हेही वाचा: मोठी बातमी: अयोध्येतील राम मंदिर उडवून देण्याची धमकी; अल कायदाने भारतीय मुसलमानांना केले ‘हे’ आवाहन )

पवार यांनी आपल्या भाषणात ऑलिंपिक भवन उभारणीमधील अडचणी लवकरात लवकर दूर कराव्यात अशी मागणी केली. ते पुढे म्हणाले, क्रीडा क्षेत्राच्या विकासाकरिता राजकीय मतभेद दूर ठेवीत सर्वतोपरी प्रयत्न करण्याबाबत आम्ही नेहमीच कटिबद्ध असतो. राज्यामध्ये स्वतंत्र क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याची प्रक्रिया यापूर्वी सुरू करण्यात आली आहे. हे क्रीडा विद्यापीठ लवकरात लवकर सुरू व्हावे, अशी अपेक्षा आहे. खेळाडूंना नोकरीमध्ये असलेल्या पाच टक्के आरक्षणाबाबत येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत. ऑलिंपिक चळवळीचे महत्त्व राज्याच्या कानाकोपऱ्यातील लोकांपर्यंत पोहोचवावे यासाठीच आम्ही मिनी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा नऊ ठिकाणी घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यास खेळाडू आणि लोकांचाही अतिशय सकारात्मक प्रतिसाद लाभला आहे.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने मिळवलेला विजेतेपदाचा चषक मुख्यमंत्र्यांकडे सोपवण्यात आला. तसेच राज्य मिनी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेसाठी वेगवेगळ्या ठिकाण आलेल्या क्रीडा ज्योतीचे एकत्र करून मुख्य ज्योत प्रज्वलित करण्यात आली. राज्याचे क्रीडायुक्त डॉक्टर सुहास दिवसे यांनी प्रास्ताविक केले तर नामदेव शिरगावकर यांनी आभार मानले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.