शिवसेनेत फुट पडल्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे पहिल्यांदाच एका मंचावर येणार आहेत. २३ जानेवारीला विधानभवनात होणाऱ्या कार्यक्रमाचे निमंत्रण या दोन्ही नेत्यांना देण्यात आले आहे. शिवसेनेतील फुटीनंतर पहिल्यांदाच आमने-सामने येणारे हे नेते काय प्रतिक्रिया देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
ठाकरे निमंत्रण स्वीकारणार का?
विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात बसविण्यात येणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण २३ जानेवारीला होणार आहे. यानिमित्ताने आयोजित केलेल्या विशेष समारंभाला ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, पार्श्वगायिका आशा भोसले यांना खास पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात येणार आहे. तसेच शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनाही या कार्यक्रमात व्यासपीठावर स्थान देण्यात येणार आहे. मात्र, ठाकरे हे निमंत्रण स्वीकारणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
(हेही वाचा देशात ‘लव्ह जिहाद’चा उच्छाद; ५ वर्षांत ४०० प्रकरणे; देशपातळीवर धर्मांतरविरोधी कायदा होण्याची गरज)
विधान भवनात बाळासाहेबांचे तैलचित्र लावणार
मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच एकनाथ शिंदे यांनी विधान भवनात बाळासाहेबांचे तैलचित्र लावण्याचा संकल्प केला. त्यानुसार विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरेंचे तैलचित्र विधान भवनात बसवण्याबाबत अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार हा निर्णय घेतल्याचे नार्वेकर यांनी विधिमंडळाच्या नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात जाहीर केले होते.
वीर सावरकरांशेजारी बाळासाहेबांचे तैलचित्र
त्यानुसार २३ जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. विधानसभा अध्यक्षांनी शुक्रवारी या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. त्यात मध्यवर्ती सभागृहात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या शेजारीच बाळासाहेबांचे तैलचित्र लावण्याचा निर्णय झाल्याचे समजते.
Join Our WhatsApp Community