एकनाथ शिंदे यांच्यासमवेत ४० आमदारांनी उठाव केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. त्यानंतर उद्धव ठाकरेंपाठोपाठ एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांनीही शिवसेनेवर दावा सांगितल्याने खरी शिवसेना कुणाची, असा पेच निर्माण झाला आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालय आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडून तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून निवडणूक आयोग लवकरच शिवसेनेच्या दोन्ही गटातील आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांची ओळख परेड घेणार असल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.
खरी शिवसेना कोणाची, या वादावर तोडगा काढण्यासाठी निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना प्राथमिक सदस्य आणि पदाधिकाऱ्यांची प्रतिज्ञापत्रे सादर करण्याची सूचना केली होती. त्यानुसार शिवसेनेच्या उद्धव गटाने २० लाख, तर शिंदे गटाने १० लाख सदस्यांचे अर्ज केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर केले आहेत. यासंदर्भात १२ जानेवारीपासून सुनावणी सुरू होणार आहे. जानेवारीच्या अखेरीस किंवा फेब्रुवारीपर्यंत अंतिम निर्णय येणे अपेक्षित असल्याचे या सूत्रांनी सांगितले.
(हेही वाचा बांगलादेशी हटाव, दादर बचाव; भाजप आक्रमक)
ओळख परेड का?
- केंद्रीय निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्र सादर करताना दोन्ही गटांनी सर्वाधिक लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी आपल्याकडेच असल्याचा दावा केला आहे. त्याची प्रत्यक्ष पडताळणी करण्यासाठी आमदार, खासदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची ओळख परेड घेतली जाणार आहे.
- प्राप्त परिस्थितीत आमदार आणि खासदारांची संख्या शिंदे गटाकडे सर्वाधिक आहेत. त्यामुळे त्यांचे पारडे जड दिसत असले, तरी शिवसेनेच्या घटनेनुसार वैध असलेले प्रमुख पदाधिकारी कोणाकडे आहेत, यावर आयोग अंतिम निर्णय देणार आहे.