महाराष्ट्रातील राजकारण्यांना मनसेच्या संदीप देशपांडेंनी दिली गल्लीतील कुत्र्यांची उपमा

144

मुंबईसह राज्यातील प्रमुख मुद्यांवर तसेच विषयांवर न बोलता जनतेचे लक्ष दुसऱ्याच विषयांवर केंद्रीत करण्याची सध्या राजकीय पक्षांमध्ये स्पर्धा लागली आहे. त्यावर मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी जोरदार टिप्पणी करत त्यांना गल्लीतील कुत्र्याची उपमा दिली आहे. एका गल्लीतील कुत्रा दुसऱ्या गल्लीत गेल्यानंतर त्या गल्लीतील कुत्र्यांची टोळी त्याच्यावर भूंकत तुटून पडते, तसेच सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात पहायला मिळत आहे. गल्लीतील कुत्र्यांची टोळी एकमेकांवर का भूंकतात, हे जसे आपल्याला कळत नाही, तसेच राजकारणीही एकमेकांवर का तुटून पडतात, हेही कळत नाही. मागील चार महिन्यांमध्ये महाराष्ट्रातील एका तरी प्रश्नांवर राजकारणी बोलले आहेत का? चर्चा केली का? असा सवाल करत हे मोठे षडयंत्र असल्याची शंकाही त्यांनी उपस्थित केली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने आगामी महापालिका निवडणुकीच्या पूर्व तयारीच्या अनुषंगाने ‘घे भरारी’ अभियानांतर्गत दादर-माहिम विधानसभेच्यावतीने जाहीर सभा दादर पश्चिम येथील केशवराव दाते मैदानात शनिवारी, ७ जानेवारी आयोजित करण्यात आली होती. या घे भरारी अभियानाच्या शुभारंभाच्या जाहीर सभेत बोलतांना मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी सध्याच्या राजकारणाचा समाचार घेतला. याप्रसंगी मनसेचे नेते प्रकाश महाजन, नितीन सरदेसाई, महिला सरचिटणीस स्नेहल जाधव, विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार, उपविभाग अध्यक्ष मनिष चव्हाण, शाखाध्यक्ष संतोष साळी तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

(हेही वाचा राहुल गांधी यांच्या ‘टी शर्ट’ ची पोलखोल; भाजपच्या नेत्यांचे ट्विट व्हायरल)

जनतेच्या मूळ प्रश्नावर विचारच नाही!

यावेळी उपस्थित मनसैनिकांना मार्गदर्शन करतान देशपांडे म्हणाले, आज या विभागातील जनता वेगळ्या विवंचनेत आहे. कुणाच्या घरी कुणी आजारी आहे, त्यांच्यावर उपचार योग्य होतील का? तर कुणाची इमारत धोकादायक झाली, तर कुठे इमारत पुनर्विकासाचे काम रखडल्याने भाडे मिळत नाही, ते भाडे मिळेल का? इमारतीचे काम सुरु होईल का? मंदीच्या वातावरणात नोकरी टिकेल का, अशा विविध चितांनी लोक ग्रासलेले आहेत, पण त्यांना छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, पंडित नेहरु, सावित्रीबाई यांच्या नावाने वाद करून त्यांच्या मूळ प्रश्नांवर आणि समस्यांवर विचारच केला जात नाही, असे देशपांडे म्हणाले.

पाच वर्षांत दोन लाख कोटींचा कर वसूल, पण सुविधा कुठे?

मुंबई महापालिकेचा हजार कोटींचा अर्थसंकल्प आहे. पाच वर्षांमध्ये रस्त्यांवर १५ हजार कोटी रुपये खर्च झाले, तरीही रस्त्यांवर खड्डे पडतात. २५ वर्षांत एक चांगला रस्ता बनला नाही, पण वांद्र्यात नवीन मातोश्री बांधली गेली. पाच वर्षांत आरोग्यावर दहा हजार कोटी रुपये खर्च केले, पण एकही रुग्णालय सुधारले नाही, पण यशवंत जाधवांकडून मातोश्रीला ५० लाखांचे घड्याळ दिले जाते. जर आम्ही करदाते सर्व प्रकारच्या कराची रक्कम भरतो, तर आपल्याला चांगली सुविधा नको का, असा सवाल करत देशपांडे यांनी पाच वर्षांत दोन लाख कोटींची कराची रक्कम भरली, दर वर्षाला हजार ते बाराशे कोटींचे औषधे खरेदी करतो, तरीही रुग्णालयात मोफत औषधे मिळत नाही, शाळांमध्ये प्राथमिक शिक्षण, ना सकाळ, संध्याकाळचे फिरता यावे म्हणून उद्यानांची सुविधा. पाच वर्षांत दोन लाख कोटी रुपये कराच्या रुपात महापालिकेने मिळवले, पण मुंबईकरांना त्याबदल्यात काय सुविधा दिल्या असाही सवाल उपस्थित केला.

भावनिक मतदान नको!

आगामी महापालिकेने भावनिक मतदान नको असे सांगत प्रश्न वेगळे आणि उत्तरे वेगळी अशीच परिस्थिती येणाऱ्या निवडणुकीत सत्तेवरील राजकीय पक्षांकडून मिळेल, याबाबत सैनिकांना सावध राहण्याचा इशारा दिला. मग पाठित खंजीर खूपसला, ५० खोके यावरुन राजकारण केले जाईल, पण त्याच्याशी जनतेचे देणे घेणे काय, असा सवाल करत जनतेला चांगले आयुष्य कधी मिळणार, हा प्रश्न घेऊन मनसे आगामी निवडणुकीला सामोरे जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

(हेही वाचा कारगिल युद्धाच्या विजयगाथा सांगताना परमवीरचक्र सन्मानित योगेंद्र सिंह यादव यांनी सांगितले थरारक अनुभव)

तर बाळासाहेबांनी भावोजींना चपलेने मारले असते!

शिवसेनेने देव सुध्दा सोडल नाही, असे सांगत देशपांडे यांनी श्री सिध्दीविनायक मंदिरातील भ्रष्टाचारावर लक्ष वेधले. मनसेचे विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी हे प्रकरण उघडकीस आणल्याचा दाखला देत देशपांडे यांनी श्री सिध्दीविनायक मंदिराचे पैसेही सोडले नाही. हीच बाळासाहेबांची शिकवण का, असा सवाल करत बाळासाहेब खाली उतरले तर भावोजींना चपलेने मारले असते. त्यांनी ही थेरं चालू दिली नसती.

आता ओवेसींची मांडी खाली आहे…

मनसेचे धोरण वारंवार बदलते अशा प्रकारचे आरोप केला जातो, या आरोपांचा समाचार घेताना देशपांडे यांनी शिवसेनेने २०१४ला मोदीजींचा चेहरा दाखवून निवडणूक लढवली. पाच वर्षे भांडले आणि २०१७ची महापालिका निवडणूक स्वतंत्र लढवली. पुन्हा २०१९च्या विधानसभेत एकत्र आले आणि निवडणूक आल्यावर शरद पवारांच्या मांडीवर जावून बसला. अडीच वर्षे सत्ता भोगल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितशी युती, संभाजी ब्रिगेडसोबत युती आता ओवेसींची मांडी खाली आहे, तिथेही त्यांनी जावून बसावे, असाही टोला त्यांनी शिवसेनेला लगावला. त्यामुळे उध्दव ठाकरे यांनी आपला चेहरा जरा आरशात जावून पहावा की आपण स्वत: धोरणावर किती ठाम आहोत ते. मनसेने केले ते डंके के चोटपर केले आहे. आम्ही घाबरलो नाही. राजसाहेबांनी जेव्हा खटकले तेव्हा टिकाही केली आणि जेव्हा योग्य निर्णय वाटला तेव्हा पंतप्रधानांचे अभिनंदनही केले, असे म्हणाले.

महापालिकेवर मनसेच

उध्दव ठाकरे यांच्यासारखा एवढा रंग बदलणारा सरडा बघितला नाही. राज ठाकरे यांनी महाराष्ट्रासाठी, मराठी जनता आणि हिंदुंच्या भल्यासाठीच केले आहे. आपला नेता कधीही सत्तेसाठी विकला गेलेला नाही, असे सांगत देशपांडे यांनी येणाऱ्या महापालिकेत मनसेची सत्ता येईल ही काळ्या दगडावरील पांढरी रेघ असल्याचे निक्षून सांगितले.

(हेही वाचा कोणालाही आता इतिहासतज्ज्ञ झाल्याचे वाटते; महापुरुषांच्या अवमानावरून राज ठाकरे यांचा टोला )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.