नव्या वर्षाच्या स्वागतासाठी नवी मुंबईतील जोडपे लोणावळ्याला गेले. 31 डिसेंबर रोजी जलतरणाचा सराव करताना अचानक नवऱ्याच्या हालचाली बंद झाल्याचे पत्नीने पाहिले. पती बराच वेळ जलतरणातच पडून राहिल्याने पत्नीला शंका आली. डॉक्टरांच्या तपासणीत पती जलतरणात उडी मारताना डोक्याला मार लागल्याचे स्पष्ट झाले. अखेरीस रुग्ण मेंदू मृत झाल्याचे निदान होताच डॉक्टर पत्नीने पतीचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. मुंबईतील पहिले अवयवदान डॉक्टर पत्नीच्या धाडसी निर्णयातून पार पडले.
नेमके काय घडले?
32 वर्षीय इसम 31 डिसेंबरला लोणावळा येथील हॉटेलमधील जलतरण तलावात पोहत होता. तो माणूस पाण्यात पोहायचा थोड्या वेळाने बाहेर यायचा, पुन्हा पाण्यात उडी घ्यायचा, असे त्याचे सुरु होते, मात्र काही वेळाने तो माणूस बराच वेळ पाण्याच्या बाहेर आला नाही, त्या व्यक्तीच्या पत्नीला शंका आली. तिने तातडीने इतरांच्या मदतीने पतीला जलतरण तलावातून बाहेर काढले. त्याला तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथून दुसऱ्या दिवशी त्याला वाशी येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. आठवड्याभराच्या उपचारानंतर अखेरीस 6 जानेवारीला डॉक्टरांनी रुग्ण मेंदू मृत झाल्याचे घोषित केले. केवळ चौदा महिन्यांचा संसार इथेच संपल्याचे दुःख पचवत पत्नीने अवयव दानाला संमती दिली. रुग्णाच्या मृत्यू पश्चात हृदय आणि दोन मूत्रपिंडे दान केली. या अवयवदानामुळे तीन जणांना जीवनदान मिळाले.