बाळासाहेबांची शरद पवारांशी मैत्री होती, परंतु त्यांनी त्यांच्याशी कधीही राजकीय मैत्री केली नाही, कारण ते पवारांना चांगले ओळखत होते. परंतु ज्यांच्याशी बाळासाहेबांनी कधी मैत्री केली नाही, त्यांच्याशी उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या क्षणिक लाभासाठी बाळासाहेबांनी जपलेली तत्वे सोडून दिली, असे सांगत शिवसेनेची दोन छकले करण्याचा डाव शरद पवार यांचाच असल्याचा आरोप मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेशिवाय राहू शकत नाही असे सांगत आता ते दुसरा गेम खेळत आहे. सन २००४ साली त्यांनी जाती जातीत भांडणे लावून आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केला होता, तो प्रयत्न आता पुन्हा सुरु झाल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचा समाचार घेतला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने घे भरारी अभियान राबवण्यात येत असून या अभियानाच्या शुभारंभाची जाहीर सभा दादर माहिम विधानसभा क्षेत्राच्यावतीने दादर पश्चिम येथील केशवराव दाते मैदानात शनिवारी पार पडली. या सभेत बोलतांना प्रकाश महाजन यांनी शिवसेनेवर चांगले तोंडसूख घेतले. ते म्हणाले, उध्दव ठाकरे म्हणतात, बाप पळवणारी टोळी. माझा बाप पळवला. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सर्वांचेच पिता होते. ते हिंदुह्दयसम्राट होते, पण आपला बाप म्हणणारे उध्दव ठाकरे २००५च्या महापुरात मुंबई बुडाली होती, तेव्हा बाळासाहेबांना सोडून कुठे पळून गेले होते, असा सवाल केला. शिवसेनेतील हे बाप बेटे नव्याने स्थापन झालेल्या सरकारला अनैतिक सरकार, घटनाबाह्य सरकार म्हणत आहे, अरे पण तुझा बाप अविश्वास ठरावाला तरी सामोरा गेला होता, असा सवाल करत महाजन यांनी माझा बाप पळवला अशाप्रकारचा शब्द प्रयोग केवळ उध्दव ठाकरे हे जनतेची सहानभूती मिळवण्यासाठीच करत असल्याचीही टीका केली.
(हेही वाचा महाराष्ट्रातील राजकारण्यांना मनसेच्या संदीप देशपांडेंनी दिली गल्लीतील कुत्र्यांची उपमा)
मग हा अपमान नाही का?
राज्यपाल महोदयांवर आपली टीका करण्याची योग्यता नाही. परंतु त्यांनी जेव्हा ज्या नेत्यांची तुलना युगप्रवर्तकांशी केली, त्यावेळी त्यांच्यापैकी एकही उठून म्हणाला नाही की, महाराजांशी आमची तुलना नको म्हणून. पण त्यांच्यावरुन वाद होतो, पण सुषमा अंधारे या संजय राऊत यांच्या आईला जिजाऊ म्हणाल्या. हा अपमान नाही का? आम्ही धर्मवीर म्हणायला सांगितले तर म्हणाल, आम्ही म्हणणार नाही म्हणून.
उद्धवच्या शिवसेनेत पुरुष बिनकामाचे, महिला पडल्या अंधारात
शिवसेनेची दोन छकले पडलीत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत सध्या महिलांचे राज्य आहे. पुरुष काही कामांचे राहिलेले नाही. त्यातही एवढे दिवस शिवसेनेच्या महिला काम करत असल्याने उजेडात होत्या, प्रकाशात होत्या, त्या महिलाही ‘ही बाई’ (सुषमा अंधारे) आल्यामुळे अंधारात गेल्या, अशा शब्दात मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी शिवसेना पक्षावर टिका केली. ही अंधारे बाई बाळासाहेबांना ८५ वर्षांची म्हातारं म्हणाली होती, एवढंच काय तर शिवसेनेला त्यांनी काँग्रेसच्या परडीतील नाग असेही संबोधले होते, ते आता शिवसैनिकांना चालते.
या म्हशीच्या स्वप्नात…
या प्राध्यापक आहेत, त्यांचा अभ्यास आहे तरी ती काय म्हणते, तर एकनाथ महाराज कुत्र्याच्या मागे तुपाची रोटी घेऊन गेले. अरे याच एकनाथ महाराजांनी आपल्या वडिलांच्या वर्षश्राध्दाला दलितांना जेवण घातले म्हणून बाह्मणांनी त्यांच्यावर बहिष्कार घातला हे सांगायला अंधारे कशा विसरल्या. याच एकनाथ महाराजांनी १४ श्लोकाचे भागवत लिहिले म्हणून काशीत हत्तीवरुन मिरवणूक काढली. ही बाई आपल्या देवदेवतांची थट्टा उडवते आणि कोल्हापूरच्या मंदिरात श्रीफळ स्वीकारते. एवढंच काय तर ज्ञानेश्वराने रेड्याला ज्ञानेश्वरी शिकवली पण माणसाला नाही शिकवली. आता या बाईला कोण सांगणार की, ज्ञानेश्वरी लिहिलीच माणसांसाठी. पण या म्हशीच्या स्वप्नात जर रेडाच येत असेल, तर आम्ही काही बोलू शकत नाही, अशा शब्दात अंधारेंचाही समाचार घेतला.
(हेही वाचा राहुल गांधी यांच्या ‘टी शर्ट’ ची पोलखोल; भाजपच्या नेत्यांचे ट्विट व्हायरल)
समृध्दी महामार्ग म्हणजे राजहट्ट
राज्यात नवीन सरकार ते तरी फार चांगले कुठे असा सवाल करत महाजन यांनी समृध्दी मार्ग म्हणजे राजहट्ट असल्याचे म्हटले आहे. लाखो कोट्यवधी रुपये खर्च केले, जमिन उध्वस्त केली, राहिलेल्या शेतीतून चांगली माती नेली, विधानसभेच्या माजी अध्यक्षांच्या १०० एकर जमिनीतील माती काढून नेली, त्याचा टॅक्स किती तर किलोमीटर मागे पावणे दोन रुपये. आता या टोल विरोधात आपल्याला आंदोलन घ्यावेच लागेल असा इशारा दिला
शिंदे-फडणवीस सरकारला किंमत मोजावी लागेल
राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे राज ठाकरे यांच्या घरी येतात, मैत्रीची दुआई देतात. पण राज ठाकरे यांच्या नावावर १०० केसेस आहेत, ते तुम्ही एक काम करून शकत नाही. एक अध्यादेश काढला तर मनसैनिकांच्या नावावरील केसेस निघून जातील, पण सरकारमधील पक्षाने लक्षात ठेवावे, याची किंमत मोजावीच लागेल. येणाऱ्या निवडणुकीत याची किंमत चुकवावीच लागेल.
राज ठाकरेंनी अयोद्धेत न जाण्याच्या षडयंत्रात भाजपच
राज ठाकरे यांचे अयोद्धेला जायचे ठरवले तेव्हा कोण तो ब्रीजभूषण सिंह आव्हान देतो. मी तीन तास संभाजीनगर होतो, राज ठाकरेला भिडण्याआधीच त्यांच्या कार्यकर्त्याला भिड म्हणून, पण तो तीन पाट माणूस आलाच नाही. पण तेव्हा राज्यातील भाजपचा नेता म्हणाला नाही की, त्यांना राम मंदिराच्या दर्शनाला जावू दया? का तर, त्यांना भिती होती की, हे जर हिंदुत्वाचे नेते उभे राहिले तर आपले दुकान कोण चालवेल? भाजपचे हिंदुत्व मला विचारा असे सांगत चंद्रपुरातील भाजपचा नेता पिरावर चादर चढवायला जातो, पण हिंदु नेता मंदिरात पिंतांबर नेसून येतो का? राज ठाकरेला अयोध्देत न जाण्याच्या षडयंत्रात हे सुध्दा लोक आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीत याचा बदला घेणार असाही इशारा महाजन यांनी दिला.
तरीही लोक राज ठाकरेंकडे येतात
राज ठाकरे यांच्याकडे काही सत्ता नाही, तरीही लोक राज ठाकरेंकडे का जातात, तर स्फटीकासारखे निर्मळ मन, जे पोटात तेच ओठात आणि जे ओठात तेच पोटात. दुसरे काही नाही, जनतेसाठी काम करायचे. हा नेता उभा राहिला तर आपले दुकान बंद पडेल, याचीच भीती प्रत्येकाला आहे असे ते म्हणाले.
(हेही वाचा कारगिल युद्धाच्या विजयगाथा सांगताना परमवीरचक्र सन्मानित योगेंद्र सिंह यादव यांनी सांगितले थरारक अनुभव)
Join Our WhatsApp Community