राज ठाकरे जेव्हा जेव्हा पुण्याच्या दौऱ्यावर असतात तेव्हा मनसेचे पुणे येथील नेते वसंत मोरे हे चर्चेत येतात. कारण मागील वर्षी वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्या मशिदीवरील भोंग्यांच्या भूमिकेला विरोध केला होता, तेव्हापासून ते मनसेत नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत, ही चर्चा अजून संपायला तयार नाही. तेव्हापासून राज ठाकरे जेव्हा जेव्हा पुण्याला गेले, तेव्हा तेव्हा ते वसंत मोरे यांना भेटणार का, अशा चर्चा रंगू लागली. रविवार, ८ जानेवारी रोजीदेखील राज ठाकरे पुण्यात आहेत आणि पुन्हा वसंत मोरे चर्चेत आले आहेत. कारण राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी त्यांचा ‘वसंता’ थेट राज ठाकरे यांच्या पुण्यातील निवासस्थानी गेला आहे.
वसंत मोरे थेट राज ठाकरेंच्या भेटीला
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यातील महत्त्वाचे नेते वसंत मोरे हे गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना खडेबोल सुनावले होते. त्यांनी सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना सोशल मीडिया किंवा प्रसारमाध्यमांसमोर भूमिका मांडण्यास मज्जाव केला होता. त्यानंतर वसंत मोरे नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. या सगळ्या घडामोडींदरम्यान वसंत मोरे यांनी स्वत: राज ठाकरे यांच्या पुण्यातील निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. त्यामुळे वसंत मोरे यांच्या नाराजीच्या चर्चांना मोरेंकडूनच ब्रेक देण्याचा प्रयत्न करण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. आगामी महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्याकडून पुण्यात मोर्चेबांधणी सुरु आहे. त्यासाठी राज ठाकरे हे स्वत: लक्ष देत आहेत. ते पुणेकरांशी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे संवाद साधत आहेत. पुण्यातील तळागळ्यातील कार्यकर्त्यांना भेटण्याचा प्रयत्न करत आहेत. कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत.
(हेही वाचा राहुल गांधी यांच्या ‘टी शर्ट’ ची पोलखोल; भाजपच्या नेत्यांचे ट्विट व्हायरल)
वसंत मोरेंनी वारंवार नाराजी व्यक्त केली
पुण्यात मनसेच्या गोटात पदाधिकाऱ्यांमध्ये अंतर्गत कलह असल्याच्या अनेक बातम्या याआधी समोर आल्या आहेत. विशेष म्हणजे पुण्याचे माजी शहाराध्यक्ष वसंत मोरे यांनी वेळोवेळी आपली नाराजी जाहीर केली. आपल्या पक्षातील इतर पदाधिकाऱ्यांकडून डावलले जाते, बैठकांना बोलावले जात नाही, अशी तक्रार अनेकदा वसंत मोरे यांनी प्रसारमाध्यमांसमोरही केली. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातूनही त्यांनी राज ठाकरेंना उद्देशून तक्रार केली.
Join Our WhatsApp Community