पवार कुटुंबात २०२४ ला राजकीय भूकंप?

149

सहा दशकांहून अधिक काळ महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात दबदबा राखून असलेल्या पवार कुटुंबात फुटीचे संकेत मिळत आहेत. अजित पवार यांचे राष्ट्रवादीतील ‘वजन’ कमी करण्यासाठी पक्षातील काही नेत्यांसह कुटुंबातील व्यक्तींचीही धडपड सुरू असून, त्याबाबत अजितदादा तीव्र नाराज आहेत. त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीपूर्वी ते वेगळा निर्णय घेऊ शकतात, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.

अजित पवार आणि शरद पवार यांच्यात दीर्घकाळापासून मतभेद आहेत. पण, महाविकास आघाडी सरकार पायउतार झाल्यापासून त्याची धार तीव्र झाली. सुरुवात झाली ती विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावरून. शिंदे-फडणवीसांनी एकत्र येत सत्ता स्थापन केल्यानंतर राष्ट्रवादीने चाणक्यनिती वापरत विरोधी पक्षनेतेपद आपल्याकडे ठेवले. या पदासाठी जयंत पाटील प्रबळ दावेदार मानले जात होते. शरद पवारही त्यांच्यासाठी आग्रही होते. मात्र, अजित पवार यांनी आपले राष्ट्रवादीतील ‘वजन’ वापरून विरोधीपक्ष नेतेपद पदरात पाडून घेतले. अजित पवारांच्या या खेळीमुळे पवार नाराज झाले व तेव्हापासून दादांचे पक्षातील ‘वजन’ कमी करण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू झाले, अशी माहिती राष्ट्रवादीतील सूत्रांनी दिली.

राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत, अशी टिपण्णी करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पवार कुटुंबात सारे काही आलबेल नसल्याकडे अंगुलीनिर्देश केला आहे. राष्ट्रवादीच्या काही नेत्यांशी खासगीत संवाद साधला असता, त्यांनीही यास दुजोरा दिला. काका-पुतण्यामधील अंतर्गत वाद आता घरापर्यंत पोहोचला आहे. पक्षात शरद पवार आणि अजित पवार, असे दोन गट पडले आहेत. जयंत पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, अनिल देशमुख यांच्यासारखे ज्येष्ठ नेते आणि सुप्रिया सुळे, रोहित पवार अशी घरातील मंडळी शरद पवारांच्या गटात. तर, धनंजय मुंडे, राजेश टोपे, दत्तात्रय भरणे, नरहरी झिरवाळ, सुनील शेळके, संदीप क्षीरसागर असे तरुण आमदार अजित पवारांसोबत आहेत.

(हेही वाचा राहुल गांधी यांच्या ‘टी शर्ट’ ची पोलखोल; भाजपच्या नेत्यांचे ट्विट व्हायरल)

मुख्यत्वे पक्षावर नियंत्रण कुणाचे, शरद पवार यांचा उत्तराधिकारी कोण, यावरून वाद सुरू झाले आहेत. पक्षातील तरुण नेत्यांना अजित पवार हवे आहेत. तर, शरद पवार यांच्या गटातील नेत्यांची सुप्रिया सुळे यांना पसंती आहे. खुद्द शरद पवार यांनाही अजित पवारांच्या हातात पक्ष सोपावणे मान्य नाही. सुप्रिया आणि रोहितकडे त्यांचा कल अधिक आहे. त्यामुळे अजित पवार अस्वस्थ असून, इतकी वर्षे पक्षाला देऊनही कदर नसेल, तर वेगळा निर्णय घेतलेला बरा, अशा मानसिकतेत ते आहेत. याबाबत कुटुंबातील कोणीही व्यक्ती उघडपणे भाष्य करीत नसली, तरी पडद्यामागील परिस्थिती फारच वेगळी आहे, असे एका नेत्याने गोपनियतेच्या अटीवर सांगितले.

अजित पवारांचे कुटुंब आधीच लांब

२०१९ मध्ये पार्थला तिकीट देण्यावरून वाद झाल्यानंतर अजित पवार यांचे कुटुंब गोविंद बाग व सिल्वर ओकपासून लांब झाले. सणासुदीला ते एकत्र येतात. पण, पहिल्यासारखी आपुलकी राहिलेली नाही, असे अजित पवार यांच्या निकटवर्तीयाने सांगितले.

अस्वस्थतेचा स्फोट होणार?

अजित पवारांवर जेव्हा सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले, तेव्हा पक्ष पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभा राहिला नाही. मात्र शरद पवारांवर जेव्हा ईडीने ठपका ठेवला, तेव्हा त्यांच्यासाठी सगळे नेते एकत्र आले, कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. याची सलही त्यांच्या मनात आहे. २०१९ला पार्थचा पराभव, रोहितचा विजय, सुप्रिया आणि रोहितचे पक्षातील वाढते प्रस्थ, पार्थच्या राजकीय भवितव्यासाठी कुटुंबाकडून येत असलेला दबाव, पक्षात आपण डावलले जात असल्याची वाढती भावना, ईडी चौकशीची टांगती तलवार, या आणि अशा कारणांमुळे अजित पवार अस्वस्थ असून या अस्वस्थतेचा स्फोट होऊ शकतो, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

सुप्रिया ‘इन’ अजित दादा ‘आउट’?

२००६ मध्ये सुप्रिया सुळे राजकारणात सक्रिय झाल्यानंतर अजित पवार यांची नाराजी उघड होत गेली असली, तरी त्याची तीव्रता अलीकडच्या काळात वाढली आहे. २०१४ मध्ये राज्यातली सत्ता गेल्यानंतर अजित पवार यांच्यामागे सिंचन गैरव्यवहार प्रकरणी चौकशीचा ससेमिरा लागला. या दरम्यानच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसने सुप्रिया सुळे यांचे नेतृत्व पुढे आणण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यामुळे पक्षात आपल्याला डावलले जात असल्याची भावना अजित पवारांमध्ये दृढ होत गेली. २०१७ मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या. त्यात पिंपरी-चिंचवड, पुणे, मुंबई आणि इतर महापालिकांचा समावेश होता. या निवडणुकांवेळी सुप्रिया सुळे यांना पक्षाच्या प्रमुख नेत्या म्हणून प्रस्थापित करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीत सुरू झाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोशल मीडिया सेलकडून पद्धतशीरपणे केवळ सुप्रिया यांच्या सभा आणि इतर कार्यक्रमांना जास्तीत जास्त प्रसिद्धी दिली जात होती. मुख्य मीडियातही त्यांचीच चर्चा होती. मतदान झाले आणि निकाल लागले. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका राष्ट्रवादी काँगेसच्या ताब्यातून निसटल्या. या दोन्ही शहरांवर एकेकाळी अजित पवार यांचा एकछत्री अंमल होता. त्यांच्या गोटातले जवळपास सर्वच नगरसेवक भाजपमध्ये गेले. त्यानंतर हा राष्ट्रवादीचा पराभव की, अजित पवार यांनी दाखवलेली आपली ताकद, याच्या चर्चा त्यावेळी रंगल्या होत्या.

(हेही वाचा कारगिल युद्धाच्या विजयगाथा सांगताना परमवीरचक्र सन्मानित योगेंद्र सिंह यादव यांनी सांगितले थरारक अनुभव)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.