नाण्याला दोन बाजू असतात, अगदी त्याचप्रमाणे सोशल मीडियाचा वापर कसा करायचा हे पूर्णपणे आजच्या तरुणाईच्या हातात आहे. काहीजण आपल्या आवडीनुसार ध्येयपूर्तीसाठी या माध्यमाचा वापर करतात, तर अनेकजण केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर चुकीच्या पद्धतीने करतात, असे मत सोशल मीडिया इन्फ्लूसर अविनाश आंब्रे यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’ला दिलेल्या विशेष मुलाखतीच्या वेळी व्यक्त केले.
संस्कृती, परंपरा सोशल मीडियाच्या माध्यमातून जपता येते
लोकलमधील आमच्या प्रवासी समुहाच्या भजनी मंडळात मी गायलेली भजने व्हायरल झाल्यामुळे मला एक नवी ओळख सोशल मीडियाच्या माध्यामातून मिळाली. भजने व्हायरल झाल्यामुळे आपली संस्कृती, परंपरा सुद्धा या सोशल मीडियाच्या माध्यमातून जपता येते, हा विश्वास अनेकांच्या मनात निर्माण झाला. आज फक्त भारतातून नाहीतर जगभरातून मला माझ्या कामाची पोचपावती देणारे मेसेज येतात. तुमच्यामुळे आज आमच्या मुलांना भारतीय संस्कृतीचे दर्शन घडत आहे, असे मेसेज पाहून मला समाधान मिळते. एकंदर समाजमाध्यमांतून खूप काही नवनवीन शिकता येतं, तसेच जगभरातील विविध गोष्टींची माहिती एका क्लिकवर मिळते. आजच्या तरुणाईने आपल्याला विशेष काय करता येतं, याचा विचार करून आपली कला, सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवली पाहिजे. व्हिडिओ करताना आपल्या प्रयत्नांना यश मिळो वा न मिळो, त्यातून आपल्याला समाधान मिळाले पाहिजे. त्यामुळे कमी लाईक्स, कमी व्ह्यूज आले तर निराश न होता आपण आपले काम करणे गरजेचे असते, असेही अविनाश आंब्रे म्हणाले.
(हेही वाचा कारगिल युद्धाच्या विजयगाथा सांगताना परमवीरचक्र सन्मानित योगेंद्र सिंह यादव यांनी सांगितले थरारक अनुभव)
Join Our WhatsApp Community