दादरमधील मुस्लिम फेरीवाल्यांविरोधातील आंदोलनात भाजपमध्येच फूट

177

दादरमधील फेरीवाल्यांच्या म्होरक्या जमालला अटक करण्यासाठी भाजपने केलेल्या आंदोलनात उभी फूट दिसून येत आहे. भाजपचे सचिव जितेंद्र राऊत आणि माहिम विधानसभा अध्यक्षा अक्षता तेंडुलकर यांनी पुकारलेल्या आंदोलनात भाजपचे मुंबई अध्यक्ष ऍड आशिष  शेलार यांनी पाठिंबा दिला असला तरी शनिवारी पुकारलेल्या धरणे आंदोलनात भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर, भाजपचे माहिममधील पदाधिकारी विलास आंबेकर, विवेक भाटकर, सचिन शिंदे, मनोज शाह, जितेंद्र गुप्ता आदी मंडळीच गैरहजर असल्याचे दिसून आले. त्यामुळे दादरमध्ये बाहेरुन येऊन व्यवसाय करणाऱ्या मुस्लिम फेरीवाल्यांविरोधात पुकारलेले आंदोलन भाजपचे आहे की तेंडुलकर आणि राऊत यांचे आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दादरमध्ये बाहेरुन येत मुस्लिम फेरीवाले व्यवसाय करत दादागिरी करत असल्याने या विरोधात भाजपच्या माहिम विधानसभा अध्यक्षा अक्षता तेंडुलकर यांनी उठाव केला असून याबाबत भाजप सचिव जितेंद्र राऊत यांच्यासह त्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेऊन यासर्वांचे आधारकार्ड तपासले जावे, अशा प्रकारची मागणी केली. यानंतर शनिवारी या फेरीवाल्यांच्या प्रमुख म्होरक्या असलेल्या जमाल आणि त्यांचा भाऊ शमशुद्दीन यांना अटक करण्यासाठी तसेच स्थानिक भूमिपुत्रांच्या पाठिशी उभे राहण्यासाठी माहिम भाजपच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक भाजपमधील पदाधिकाऱ्यांनी जितेंद्र राऊत व अक्षता तेंडुलकर यांना सहकार्य करण्यास नकार दिल्यामुळे अखेर भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार ऍड आशिष शेलार यांना मैदानात उतरावे लागले. त्यामुळे या आंदोलनात सहभागी होत शेलारांनी जमाल यांच्या अटकेची मागणी हे प्रकरण आता थांबणार नाही असा इशारा दिला आहे. परंतु या एकदिवशी धरणे आंदोलनात भाजपचे शेलार, राऊत आणि तेंडुलकर यांच्याव्यतिरिक्त महेश मुदलीयार आणि अंधेरीतील माजी नगरसेवक मुरजी पटेल हे उपस्थित होते. भाजपचे मुंबई अध्यक्ष या कार्यक्रमाला उपस्थित असतानाही भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर तसेच माहिम आणि दादरमधील पदाधिकारी विलास आंबेकर व विवेक भाटकर हेही उपस्थित नव्हते. भाजप ज्या जमालला अटक करण्यासाठी आंदोलन करत होते, त्याचवेळी भाजपचे स्थानिक पदाधिकारी हे जमालला वाचवण्यासाठी भाजपच्याच आमदाराकडे साकडे घालत होते. त्यामुळे आमदारांनीही यासाठी प्रयत्न सुरु केले, परंतु या प्रकरणात आशिष शेलार यांनी उडी घालत तेंडुलकर व राऊत यांच्या आंदोलनाला पाठिंबा देताच त्या आमदारानेही पाऊल मागे घेतल्याची माहिती मिळत आहे.

( हेही वाचा: सावरकर माने तेज, सावरकर माने तारुण्य… )

जमाल शिवतिर्थावर शरण

दादरमधील फेरीवाल्यांचा म्होरक्या जमाल यांच्या अटकेची मागणी भाजपकडून होत असल्याने अखेर तो शिवतिर्थावर शरण गेल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणात भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी उडी घातल्यानंतर जमालने शिवतीर्थ गाठले. शनिवारी दुपारी जमाल हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीच्या प्रतिक्षेत होता. मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या मदतीने त्याने राज ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा दादरमध्ये ऐकायला मिळत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.