राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त आणखी लांबणीवर?

131

राज्य मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार हिवाळी अधिवेशनानंतर करण्याचे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मात्र, सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता, हा विस्तार पुन्हा लांबणीवर पडण्याची दाट शक्यता आहे. बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपाच्या गोटात तशा चर्चा आहेत.

( हेही वाचा : भारतात दरवर्षाला २५ माणसे गमावतात हात, प्रत्यारोपणासाठी आर्थिक मदतीकरिता इन्शुअरन्स कंपन्यांचा नकार)

एकनाथ शिंदे यांच्यासमवेत ४० आमदारांनी उठाव केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. त्यानंतर उद्धव ठाकरेंपाठोपाठ एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांनीही शिवसेनेवर दावा सांगितल्याने खरी शिवसेना कुणाची, असा पेच निर्माण झाला आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालय आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडून तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून निवडणूक आयोग लवकरच शिवसेनेच्या दोन्ही गटातील आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांची ओळख परेड घेणार आहे.

साधारणतः फेब्रुवारीच्या पहिल्या वा दुसऱ्या आठवड्यात ही ओळख परेड होऊ शकते. त्यानंतरच मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार आहे. कारण, आताच विस्तार केल्यास मंत्रिमंडळात स्थान न मिळालेले आमदार नाराज होऊ शकतात. अशावेळी त्यांनी वेगळा निर्णय घेतला किंवा दबावतंत्राचा अवलंब सुरू केल्यास पुढची गणिते अवघड होतील. ही शक्यता लक्षात घेऊन शिंदे-फडणवीसांनी मंत्रिमंडळ विस्तार पुढे ढकलल्याचे कळते.

अशाही चर्चा…

पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारानंतर सरकारचे कामकाज सुरळीत सुरू असल्याचे सांगत, या सरकारमधील काही मंत्र्यांनीच विस्ताराला विरोध केल्याची चर्चा आहे. दुसरीकडे, नेमके कोणाला मंत्री करायचे, यावरून भाजपमध्ये निर्णय होत नसल्याने हा विस्तार रखडल्याकडे शिंदे गट बोट दाखवत आहे. शिंदे गटातील नऊ मंत्र्यांना इतर सहकारी नको असल्यानेच नव्या मंत्र्यांचा शपथविधी होत नसल्याचीही चर्चा आहे. शिंदे फडणवीस सरकारमध्ये १८ मंत्री आहेत. मंत्रिपदासाठी इच्छुकांची समजूत काढून, पहिल्या विस्तारानंतर गेल्या वर्षी १५ सप्टेंबरपर्यंत दुसरा विस्तार करण्याचे आश्वासन दोन्ही गटांकडून देण्यात आले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.