…तर महापालिकेचे अधिकारीच येणार अडचणीत!

145

दादरमधील फेरीवाल्यांचे सामान जप्त केलेले वडाळा येथील गोदामातून भाजप माहिम विधानसभा अध्यक्षा अक्षता तेंडुलकर यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी घेऊन गेल्याची तक्रार महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांकडे केली आहे. परंतु महापालिकेच्यावतीने फेरीवाल्यांचे सामान जप्त करताना कोणताही प्रकारचा पंचनामा केला जात नसून त्यांचे मुल्यमापन केले जात नाही. त्यामुळे जप्त केलेले सामान हे फेरीवाले ओळख पटवून घेऊन जात असतात. त्यामुळे कोणत्याही फेरीवाल्यांच्या सामानाची नोंदच नसल्याने पोलिसांनाही तक्रारीची दखल घेताना अनेक अडचणी येणार असून प्रत्यक्षात दिवसभरात जप्त केलेला किती माल सोडवला आणि त्यातून किती महसूल गोळा केला याची माहिती समोर आल्यास अधिकाऱ्यांचे पितळ उघडे पडण्याची महापालिकेच्या अधिकाऱ्यांना अधिक भीती असल्याचे बोलले जात आहे.

शमशुद्दीन नावाच्या अधिकाऱ्याची दादागिरी

दादरमधील फेरीवाल्यांचा जप्त केलेला माल सोडवण्यासाठी शमशुद्दीन नावाच्या अधिकाऱ्याची मर्जी लागते, त्यांच्या होकाराशिवाय महापालिकेचे अधिकारी माल सोडत नाही अशा प्रकारची तक्रार भाजपचे माहिम विधानसभा अध्यक्ष अक्षता तेंडुलकर यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह वडाळा येथील गोदामात अचानक भेट दिली. यावेळी शमशुद्दीन नावाची व्यक्ती तिथे बसलेली पाहिल्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घालत फेरीवाल्यांना आपल्या सामानाची ओळख पटवून घेऊन जाण्याच्या सूचना दिल्याचे व्हायरल व्हिडीओत स्पष्ट होत आहे. या घटनेनंतर महापालिकेने पोलिसांना पत्र पाठवून जप्त केलेल्या सामानांची लुटमार केल्याचे म्हटले आहे. शासकीय कामांमध्ये हस्तक्षेप करण्याचा हा प्रकार असून जप्त केलेल्या सामानांची मागणी फेरीवाल्यांकडून झाल्यास कुठून देणार असा प्रश्न उपस्थित करत याप्रकरणी कारवाईची मागणी केली.

(हेही वाचा काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी गावकऱ्यांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण)

महापालिका अधिकारी घाबरले

परंतु महापालिकेच्या निवृत्त अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, फेरीवाल्यांचे सामान जप्त करताना कोणत्याही प्रकारची नोंद ठेवली जात नाही. फेरीवाले आपल्या जप्त केलेल्या सामानाची ओळख पटवून त्याप्रमाणे दंडाची रक्कम भरुन घेऊन जातात. परंतु महापालिकेच्या गोदामामध्ये सरासरी दहा प्रकरणामागे एका फेरीवाल्याकडून दंडाची रक्कम घेऊन उर्वरीतांचे सामान दंडाची रक्कम पावती शिवाय स्वीकारुन सामान परत दिले जाते. त्यामुळे जर पोलिसांनी चौकशी केल्यास त्या दिवशी महापालिकेने किती फेरीवाल्यांचे सामान जप्त केले आणि किती सामान सोडवण्यासाठी दंडाची रक्कम वसूल केली व किती सामान पावतीशिवाय सोडले हे समोर येईल. त्यामुळे अशाप्रकारची तक्रारच आता महापालिका अधिकाऱ्यांच्या घशातील हड्डी बनणार आहे.

महापालिकेच्या अधिकाऱ्यांना अडचणीत आणू शकतो

विशेष म्हणजे भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडे ज्या व्यक्तीची तक्रार आली होती, ती व्यक्ती पहिल्या दिवशी पाहणी करताना दिसून आली होती आणि दुसऱ्या दिवशीही तिथे आढळून आली. त्यामुळे व्हायरल व्हिडीओत ज्या व्यक्तीला मारहाण केलेली जी व्यक्ती आहे, ती व्यक्ती महापालिकेचा कर्मचारी किंवा अधिकारी नसताना गोदामात काय करत असते, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे शमशुद्दीन नावाच्या व्यक्तीचा गोदामातील वावरही महापालिकेच्या अधिकाऱ्यांना अडचणीत आणू शकतो, असेही महापालिकेच्या काही निवृत्त अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.