बनावट इंजेक्शनच्या घोटाळ्यातील आरोपींविरोधात एफडीए न्यायालयात जाणार

142

चर्नीरोड येथील सैफी रुग्णालयातील मेडिकल स्टोअरमधून वापरलेल्या इंजेक्शनमुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर अखेरीस कारवाईला सुरुवात झाली आहे. अन्न व औषध प्रशासनाने रुग्णाच्या नातेवाईकांच्या तक्रारीची दखल घेत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारावर राज्यातील तसेच दिल्लीतील मिळून ११ फार्मा सेंटर आणि पुरवठादारांविरोधात अन्न व औषध प्रशासन (एफडीए) न्यायालयीन लढा देण्याच्या तयारीत आहे.

ऑरोफर एफसीएम इंजेक्शन दिले

ऑक्टोबर महिन्यात ५६ वर्षीय रुग्णाला चर्नी रोड येथील सैफी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णाला उपचारदम्यान ऑरोफर एफसीएम इंजेक्शन दिले गेले. या इंजेक्शननंतर रुग्णाची प्रकृती बिघडल्याने त्याला अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. दोन दिवसानंतर रुग्णाचा मृत्यू झाला. या प्रकरणी ४ नोव्हेंबर रोजी अन्न व औषध प्रशासनाकडे रुग्णाच्या नातेवाईकांनी तक्रार दाखल केली. तक्रारीची दखल घेत सैफी रुग्णालयातील इंजेक्शनचे नमुने तसेच देशभरातील बाजारात उपलब्ध असलेले नमुने एफडीएने संबंधित कंपनीला परत घेण्याचे निर्देश दिले.

(हेही वाचा राहुल गांधी यांच्या ‘टी शर्ट’ ची पोलखोल; भाजपच्या नेत्यांचे ट्विट व्हायरल)

दिल्लीतील ११ फार्मा सेंटर व पुरवठादारांविरोधात गुन्हा दाखल

जानेवारी महिन्यात प्रयोगशाळेचा अहवाल मिळाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने व्ही.पी.रोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तसेच सैफी रुग्णालयातील मेडिकल स्टोअरला नोटीस जारी केली. पोलिसांनी रुग्णालयातील मेडिकल स्टोअरसह ठाणे, पुणे, औरंगाबाद तसेच दिल्लीतील ११ फार्मा सेंटर व पुरवठादारांविरोधात गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यातील आरोपींच्या मेडिकल स्टोअर मालकांना कारणे दाखवा नोटीस एफडीए बजावणार आहे. मेडिकल स्टोअरचा परवानाही तात्पुरत्या काळासाठी बंद करण्याबाबत आम्ही येत्या दिवसांत निर्णय घेऊ असे एफडीएच्या अधिका-यांनी सांगितले. पोलिसांची कारवाई पूर्ण झाल्यानंतर उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे आरोपींविरोधात न्यायालयीन खटला दाखल केला जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.