जानेवारी महिन्याचा दुसरा आठवडा सुरु होताच आता राज्यातील बहुतांश भागांत गारठवणा-या थंडीचे आगमन झाले आहे. संपूर्ण राज्यात किमान तापमान घसरलेले असताना मुंबईत मात्र गारठवणा-या थंडीला अवकाश आहे. मात्र मुंबई महानगर प्रदेशातील कर्जत येथे मंगळवारी पहिल्यांदाच हुडहुडणारी थंडी जाणवली. कर्जत येथे किमान तापमान ९.४ अंशापर्यंत खाली घसरले. दक्षिण कोकणात सावंतवाडी येथे किमान तापमान ९ अंशापर्यंत नोंदवले गेल्याची नोंद खासगी हवामान अभ्यासकांकडून करण्यात आली.
राज्यात थंडीचा जोर वाढत असताना कोकणातील ब-याच भागांमध्ये किमान तापमान १३ ते १७ अंशापर्यंत नोंदवले जात आहे. मंगळवारी मुंबईत किमान तापमान १७ अंश सेल्सिअसवर नोंदवले गेले होते. राज्यात थंडीचा कडाका वाढत असताना कोकणात येत्या दिवसांत किमान तापमान सरासरीएवढेच राहील. देशाच्या उत्तर भागांतून वाहणा-या थंड वा-यांचा प्रभाव राज्यातील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात प्रामुख्याने दिसून येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण उत्तर मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट दिसून येत आहे. थंडीच्या वा-यांना कोकणात प्रवेश करता येत नसल्याने कोकणात अद्यापही गारठवणारी थंडी सुरु झालेली नाही. कोकणात कमाल तापमानही ३० अंशाच्या आसपासच राहील, अशी माहिती वेधशाळेच्या अधिका-यांनी दिली.
( हेही वाचा: सरकारी कर्मचा-यांचे वाढणार वेतन; ‘या’ समितीच्या अहवालानुसार प्रस्ताव सरकारकडे विचाराधीन )
खासगी हवामान अभ्यासक तसेच वेधशाळेच्या केंद्रातील किमान तापमानाची नोंद (अंश सेल्सिअस)
- सावंतवाडी – ९
- कर्जत – ९.४
- तलासरी – ९.६
- बदलापूर – १०.४
- मनोर – ११.४
- चिपळूण – १३
- कल्याण – १३.४
- डोंबिवली आणि पनवेल – १३.८
- विरार – १४.८
- रत्नागिरी – १५.८
- डहाणू – १६.२
- मुंबई – १७