महापालिकेच्या विशेष रुग्णालय तसेच प्रसुतीगृहांसह दवाखान्यामध्येही रक्तांसाहित इतर वैदयकीय निदान चाचण्या ‘आपली चिकित्सा’ अंतर्गत सवलतीत उपलब्ध करून दिले आहे. त्यानुसार मूलभूत चाचणीसाठी ५० रुपये अतिविशेष चाचणीसाठी १०० रुपये एवढा दर आकारला जात आहे. त्यामुळे महापालिकेच्या हिंदुह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे दवाखान्यांमध्ये या चाचण्या निशुल्क करण्यात आल्या आहेत. आता त्याच धर्तीवर महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांसह विशेष रुग्णालय, प्रसुतीगृहांसह दवाखान्यांमध्ये आपली चिकित्सा अंतर्गत करण्यात येणाऱ्या चाचण्यांची सेवा निशुल्क देण्याचा विचार प्रशासनाचे असल्याची माहिती मिळत आहे.
( हेही वाचा : राज ठाकरेंच्या ‘शिवतीर्थ’वर उद्योगपती अदानी; चर्चेला उधाण )
मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांसह प्रसुतीगृह तसेच दवाखान्यांमधील रुग्णांच्या रक्तांसहित इतर १०१ इतर मूलभूत नमुना चाचण्या तसेच ३८ अतिविशेष नमुना चाचण्या करण्यासाठी महापालिकेच्यावतीने शहर, पूर्व व पश्चिम उपनगरांसाठी स्वतंत्र प्रयोगशाळा संस्थांची निवड करण्यात आली. या आपली चिकित्सा अंतर्गत चाचणी निशुल्क देण्याचा निर्णय सर्वप्रथम प्रशासनाने घेतला होता. यासाठी महापालिकेने रुग्णाकडून मूलभूत नमुना प्रति चाचणीसाठी १०० रुपये शुल्क आणि अतिविशेष चाचणीसाठी २०० रुपये शुल्क आकारण्याचा प्रस्ताव प्रशासनाने ठेवला होता. परंतु स्थायी समितीने उपसूचनेद्वारे हे शुल्क अनुक्रमे ५० व १०० शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला.
‘आपली चिकित्सा’ अंतर्गत अद्ययावत विकृत चिकित्सा चाचणी निशुल्क देण्याचा निर्णय सर्वप्रथम प्रशासनाने घेतला होता. परंतु त्यानंतर प्रशासनाने यासाठी शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तत्कालिन विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी ही सेवा निशुल्क देण्याची मागणी उपसुचनेद्वारे केली होती. परंतु शिवसेना आणि भाजपच्या सदस्यांनी याला विरोध करत ती मागणी बहुमताने फेटाळून लावली. पण त्यानंतर भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी हे शुल्क निम्मे आकारावे अशी उपसूचना मांडत मागणी केली. त्यानुसार उपसुचनेसह मूळ प्रस्ताव संमत करण्यात आला. त्यामुळे मुलभूत चाचणीसाठी ५० रुपये अतिविशेष चाचणीसाठी १०० रुपये एवढा दर आकारण्यात येत आहे.
परंतु राज्यात शिवसेना भाजप यांचे सरकार पुन्हा आल्यावर व एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री व देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री बनल्यानंतर आता आपली चिकित्साअंतर्गत आकारण्यात येणाऱ्या चाचणीचे शुल्क पूर्णपणे माफ करण्याचे निर्देश दिल्याची माहिती मिळत आहे. त्यानुसार प्रशासन हे या चाचणीसाठी आकारणारे शुल्क पूर्णपणे माफ करून निशुल्क चाचणीची सेवा देण्याचा विचार करत असल्याची माहिती मिळत आहे.सध्या महापालिकेच्यावतीने नव्याने सुरु करण्यात आलेल्या हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान्यांमध्ये वैद्यकीय निदान चाचण्या निशुल्क केल्या आहेत, त्याचधर्तीवर आपली चिकित्साअंर्गत देण्यात येणाऱ्या निदान चाचण्या निशुल्क देण्याचा विचार प्रशासन करत असल्याची माहिती मिळत आहे.
भाजप म्हणते निदान चाचणीसाठी १० रुपये आकारा
दरम्यान, भाजपचे महापालिकेतील माजी गटनेते प्रभाकर शिंदे यांनी महापालिका आयुक्त व प्रशासक इक्बालसिंह चहल यांना पत्र पाठवून आपली चिकित्सा अंतर्गत नव्याने नेमण्यात आलेल्या संस्थांनी आता चाचणीसाठी ८६ रुपयांचा दर आकारला आहे. त्यामुळे २०० रुपयांच्या तुलनेत संस्थांनी निम्म्यापेक्षा कमी बोली लावल्याने याचा फायदा मुंबईतील जनतेला होणे आवश्यक आहे. त्यामुळे आपली चिकित्साअंतर्गत चाचणीसाठी आकारण्यात येणाऱ्या चाचणीसाठी १० रुपये रुग्णांकडून आकारले जावे अशी मागणी केली आहे.
Join Our WhatsApp Community