बाळासाहेबांच्या पश्चात शिवसेनेच्या घटनेत बेकायदेशीर बदल करण्यात आल्याचा दावा शिंदे गटाने मंगळवारी केंद्रीय निवडणूक आयोगात केला. त्यानंतर शिवसेना पक्षाची घटना केंद्रस्थानी आली आहे. त्यातील अधोरेखित करण्यासारखी बाब म्हणजे, शिवसेनेच्या घटनेनुसार ‘प्रतिनिधी सभे’तील २८२ सदस्य शिवसेनेचा प्रमुख नेता निवडतात. आजमितीला शिवसेनेचा प्रमुख नेता निवडणारे १०७ सदस्य उद्धव ठाकरेंकडे, तर तब्बल १७५ प्रतिनिधी सदस्य शिंदेंकडे असल्याची माहिती ‘हिंदुस्थान पोस्ट’च्या हाती लागली आहे.
शिवसेनेच्या घटनेनुसार, आमदार, खासदार, जिल्हा प्रमुख, जिल्हा संपर्क प्रमुख, मुंबईतील विभाग प्रमुख आदी प्रतिनिधी सभेचे सदस्य असतात. शिवसेनेचा प्रमुख नेता निवडण्याचा अधिकार त्यांना आहे. शिवाय हा प्रमुख नेता ज्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सहयोगाने काम करतो, त्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील १४ सदस्यांची निवडही प्रतिनिधी सभा करते. त्या सर्वांचा कार्यकाळ ५ वर्षांचा असतो.
२०१८ सालच्या नोंदीनुसार या प्रतिनिधी सभेत २८२ सदस्य होते. या सदस्यांनी उद्धव ठाकरे यांना शिवसेना पक्षप्रमुख पदी निवडून दिले. येत्या २३ जानेवारीला ठाकरेंची मुदत संपते आहे. अशावेळी पुन्हा पक्षांतर्गत निवडणूक घेऊन प्रमुख नेता निवडावा लागेल.
अडचण काय?
२३ जानेवारीनंतर उद्धव ठाकरेंचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. अशावेळी निवडणूक घ्यावी लागल्यास पुन्हा निवडून येण्यासाठी त्यांच्यासमोर पेच आहे. कारण, शिवसेनेचा प्रमुख नेता निवडणाऱ्या प्रतिनिधी सभेतील २८२ सदस्यांपैकी केवळ १०७ सदस्य ठाकरेंकडे, तर १७५ प्रतिनिधी सदस्य एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत.