पश्चिम उपनगरातील कांदिवली पूर्वेतील पोयसर या ठिकाणी असलेल्या बिहारी टेकडीच्या एका घरात गुन्हे नियंत्रण कक्षाने छापेमारी करून हजारो लिटर भेसळयुक्त दूध जप्त केले आहे. अमूल, गोकुळ यांसारख्या कंपन्यांच्या दुधात भेसळ करून त्याची विक्री हॉटेल, चहा विक्रेते आणि घरोघरी करीत असल्याचे समोर आलेले असून या प्रकरणी पोलिसांनी ५ जणांना अटक करण्यात आली, त्यात एका महिलेचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
भेसळयुक्त दूध पुन्हा पिशवीत भरून सील करीत होते
कांदिवली पूर्वेतील पोयसर विभागात असलेल्या बिहारी टेकडी या सोसायटीतील एका घरात मोठ्या प्रमाणात दुधाची भेसळ सुरु असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या गुन्हे नियंत्रण ब्युरोचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे बुधवारी, ११ जानेवारी रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास गुन्हे नियंत्रण ब्युरोच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी एक महिला आणि तीन पुरुष एका खोलीत दुधात भेसळ करून भेसळयुक्त दूध पुन्हा पिशवीत भरून त्यांना सील करीत होते. पोलिसांनी या महिलेसह तिघांना ताब्यात घेऊन सुमारे १ हजार ४० लिटर दूध जप्त करण्यात आले आहे. त्याच बरोबर भेसळ करण्यासाठी लागणारे साहित्य, अमूल, गोकुळ कंपनीच्या रिकाम्या आणि भरलेल्या पिशव्या आणि दुधात भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी आणि रासायनिक द्रव्य जप्त करण्यात आले असून तपासणीसाठी ते एफडीएकडे पाठवण्यात आले आहे.
(हेही वाचा शिवसेनेचा कारभार पक्षाच्या घटनेनुसारच चालतो का; ठाकरे गटाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह)
पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला
या प्रकरणी रोशैया (४९), श्रीनिवास नरसिंग वडला कोंड (३८), नरेश मरैया जडला (२९), अंजय्या गोपालू बोडुपल्ली (४३) आणि रामा सत्यनारायण गज्जी (३०) यांना अटक करण्यात आली, या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मुंबई पोलिसांच्या गुन्हे नियंत्रण ब्युरो आणि अन्न व औषध विभाग यांनी संयुक्तरित्या केली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मागील आठ ते दहा महिन्यांपासून ही टोळी दुधात भेसळ करून कांदिवली परिसरात भेसळयुक्त दुधाची विक्री करीत होती, समता नगर पोलिसांच्या हद्दीत सुरु असलेल्या भेसळयुक्त दुधाच्या विक्रीची माहिती स्थानिक पोलिसांना का मिळाली नाही, असा प्रश्न स्थानिक नागरिकांकडून विचारला जात आहे.
Join Our WhatsApp Community