मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘आता उद्धव ठाकरेंनी लवकर भूमिका जाहीर करावी’

142

आगामी निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युती होणार असल्याची चर्चा सुरू आहे. पण यादरम्यान वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात शिंदे गट आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. मात्र आता प्रकाश आंबेडकरांनी या भेटीनंतर पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा आपली भूमिका जाहीर केली आहे. यावेळी ते म्हणाले की, ‘एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे भेट होणारच आहे. पण प्रत्येक भेट राजकीयच असते, असा अर्थ काढणे चुकीचे आहे. पण आता आम्ही तयार आहोत, उद्धव ठाकरेंनीही भूमिका जाहीर करावी.’

नक्की काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

माध्यमांसोबत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ‘जेव्हा मी काल सकाळी दिल्लीला होतो, तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून फोन आला होता. संध्याकाळी मुख्यमंत्र्यांना आपल्याशी भेटायचं आहे, असं सांगण्यात आलं. तसंही मी मुंबईला येणार होतो. म्हणून मी होय म्हटलं. साडे १० वाजता मी त्यांना भेटायला गेला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची नोएडा येथे प्रतिकृती होणार आहे, त्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.’

…तर काँग्रेस, राष्ट्रवादीचा खिमा केला असता – प्रकाश आंबेडकर

पुढे ते म्हणाले की, ‘येणाऱ्या निवडणुका शिवसेनेसोबत लढण्याच्या निर्णयामध्ये कोणताही बदल झालेला नाही. याबाबत मुख्यमंत्र्यांना माहित आहे. तसेच ज्या पक्षासोबत भाजप आहे, त्या पक्षासोबत वंचित बहुजन आघाडीने युती केली नाही, याची त्यांना कल्पना आहे. पण शिंदेंनी भाजपाची साथ सोडली तरच त्यांच्यासोबत राजकीय चर्चा होऊ शकते, नाहीतर आमच्यात चर्चा होऊ शकत नाही. गेले ३५ वर्ष आम्ही या राजकारणात आहोत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आमचा खिमा केला. आम्ही अशी परिस्थिती असतानाही भाजपसोबत गेलो नाही. त्यावेळेस आम्ही गेलो असतो तर भाजपच्या माध्यमातून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा खिमा केला असता. माझी ताकद मला माहित आहे. माझ्या पक्षाची ताकद मला माहितेय. त्यामुळे मला यात अजिबात रस नाही. आता अंतिम निर्णय उद्धव ठाकरेंच्या हातात आहे. आम्ही आजही म्हणतो की, आम्ही सेनेसोबत समझोता करण्यासाठी तयार आहोत.’

‘महापालिकाच्या निवडणुकीसाठी आमची युती झाली आहे. पण सार्वजनिक घोषित झाली नाही. आम्ही फक्त एकमेकांना आश्वासन दिलं आहे आणि हे चार भिंतीच्या आतमधलं आहे. आता उद्धव ठाकरेंनी ठरवायचं की, चार भिंतीतलं आश्वासन कधी सार्वजनिक करायचं. दरम्यान उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे की, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊन युती जाहीर करू. परंतु काँग्रेसला मी चांगला ओळखतो. माझ्या एवढा काँग्रेसला आणि शरद पवारांना ओळखणारा महाराष्ट्रातला दुसरा नेता नाही. परंतु जोपर्यंत निवडणुका घोषित होत नाहीत तोपर्यंत उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला एकत्र घेऊन युती जाहीर करण्याचा प्रयत्न करतील’, असे प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं.

(हेही वाचा –Maharashtra Politics: मुख्यमंत्री शिंदे आणि आंबेडकरांमध्ये बंद दाराआड बैठक; एकत्र येण्याच्या चर्चेला उधाण)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.