मुंबई उपनगरातील मरोळ (प) येथील मोकळ्या जागेत मुंबई महापालिकेच्यावतीने शहरी जंगल अर्थात मियावकी गार्ड तयार करण्यात येत आहे. राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून या गार्डनचा विकास केला जाणार होता आणि यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर यापूर्वीच्या डिपीडिसीच्या निधीतून मंजूर करण्यात येणाऱ्या कामांना स्थगिती दिली होती, परंतु आता आदित्य ठाकरेंच्या संकल्पनेतील स्थगिती लावलेल्या एकामागून एक अशा कामांना आता मंजुरी दिली जात आहे.
( हेही वाचा : उदित नारायण, कुमार शानू, रणवीर शोरे डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित)
राज्याचे माजी पर्यावरण व पर्यटन तथा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी मरोळ येथील मोकळ्या जागेत मियावकी गार्डन उभारण्यासाठी डिपीडिसी अंतर्गत निधी मंजूर करून हे काम महापालिकेच्या माध्यमातून करण्यासाठी महापालिकेच्या नियोजन विभागाला निधी उपलब्ध करून दिला होता. त्यानुसार नियोजन विभागाच्या तत्कालिन सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी शहरी जंगल तयार करण्याच्यादृष्टीकोनातून अहवाल बनवला होता. परंतु हे काम पुढे रखडले होते. परंतु आता पुन्हा नव्याने नियोजन विभागाने हा प्रस्ताव तयार केला असून याला प्रशासकांनी मान्यता दिल्याची माहिती मिळत आहे.
हे मियावकी गार्डन मरोळ येथील मोकळ्या जागेत बनवण्यात आले आहे. वनीकरण केलेल्या जागेत ठराविक ठिकाणी वन्यजीव कलाकृतींचे चित्रण प्रदर्शनाकरिता कला दालन उभारले जाणार आहे. बांबुच्या सहाय्याने प्रदर्शन केंद्र, प्रशासकीय ब्लॉक, प्रथमोपचार, टिकीट घर आदी वास्तू तयार केल्या जाणार असून विविध पक्षी, फुलपाखरे यांना आकर्षित करण्याकरिता झाडे, फुलझाडे यांच्या विविध प्रजातींची लागवड केली जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. या कामांसाठी सी. आर. शाह या कंत्राटदाराची नेमणूक केली आहे. त्यामुळे या शहरी वनीकरणाच्या कामांकरता सुमारे साडे सहा कोटी रुपये खर्च केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
विशेष म्हणजे यापूर्वी माजी पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून मंजुर झालेल्या परंतु रखडलेल्या माहिम ते वांद्रे किल्ला जोड सायकल ट्रॅकच्या कामांना मंजुरी दिली होती. त्याप्रमाणे आता मरोळ येथील मोकळ्या जागेत मियावकी गार्डन बनवण्याच्या कामांनाही मंजुरी मिळाल्याने आदित्य ठाकरेंच्या रखडलेल्या योजना मार्गी लागताना दिसत आहे.
Join Our WhatsApp Community