संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आगामी ३१ जानेवारी पासून सुरू होणार आहे. यावर्षी संसदेचे अर्थंसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारी पासून सुरू होणार असून ६ एप्रिलपर्यंत चालणार आहे. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात संसदेचे कामकाज ६६ दिवस सुरू राहणार आहे. तर मधल्या काळात काही दिवसांचा ब्रेक असेल. यासंदर्भात संसदेचे कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे.
मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा पाचवा आणि शेवटचा अर्थसंकल्प
अर्थसंकल्पीय अधिवेशन एकूण ६६ दिवस सुरू राहणार आहे. ते दोन टप्प्यात चालणार आहे. पहिल्या टप्प्यात अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यात वित्त विधेयक मंजूर होईल. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीला राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं सुरू होणार आहे. यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन २०२२-२३च्या आर्थिक सर्वेक्षणाचा अहवाल संसदेच्या पटलावर ठेवतील. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच, १ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री २०२३-२४चा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करतील. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा पाचवा आणि शेवटचा अर्थसंकल्प असणार आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरही चर्चा होणार आहे.
संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी यांच्या ट्विटमध्ये नमूद केल्यानुसार, अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान १४ फेब्रुवारी २०२३ ते १२ मार्चपर्यंत सुट्टी असेल. यादरम्यान विविध मंत्रालयांशी संबंधित संसदीय स्थायी समिती अनुदानाच्या मागणीवर चर्चा करू शकतील आणि मंत्रालये, विभागांशी संबंधित अहवाल तयार करू शकतील. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा १३ मार्चपासून सुरू होणार आहे.
(हेही वाचा – गुवाहाटी, अयोध्येत ‘महाराष्ट्र भवन’ बांधणार; पण महाराष्ट्रात कधी? २५ वर्षे फाईल धूळखात)
Join Our WhatsApp Community