सुमारे ४०० किलोमीटर अंतराच्या रस्त्यांची बांधणी करण्याबाबत २४ नोव्हेंबर २०२२ रोजी अग्रणी वृत्तपत्रांमध्ये निविदा सूचना प्रकाशित करण्यात आली. याबाबतची निविदा मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरही प्रकाशित करुन भारतभरातील संभाव्य निविदाकारांना निमंत्रित करण्यात आले. या कारणाने, प्रतिष्ठित आणि ज्यांना कधीही काळ्या यादीत टाकले गेलेले नाही, असे निविदाकार या निविदा प्रक्रियेमध्ये सहभागी झाले आहेत. यातील बहुतांश निविदाकारांची उलाढाल ही एक हजार कोटी रुपयांहून अधिक असून हरित क्षेत्रात रस्ते बांधणी करणा़ऱ्या सार्वजनिक कंपन्या आहेत. जरी अशा प्रकारच्या मोठ्या कंपन्या राज्य महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्गांचे काम करीत असल्या तरी त्यांनी मुंबई महानगरातील लहान भागांमध्ये विभागलेली कामे करण्यासाठी स्वारस्य दाखविले आहे,असे महापालिका रस्ते विभागाने स्पष्ट केले आहे.
मुंबई महापालिकेने काढलेल्या रस्ते सिमेंट काँक्रीटीकरण कामांच्या निविदेसंदर्भात शिवसेना(उध्दव ठाकरे) पक्षाचे नेते व आमदार आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन यामध्ये महापालिका प्रशासनावर आरोप केले. या संदर्भात महापालिका रस्ते विभागाच्यावतीने खुलासा करण्यात आला आहे. यामध्ये प्रशासनाने असे म्हटले आहे की, या आधी निविदा मागविताना त्या जुन्या दरांनुसार मागविण्यात आल्या होत्या. ज्यामुळे कंपन्यांनी त्यात फारसे स्वारस्य दाखविले नाही. स्पर्धांत्मकता वाढविण्याच्या दृष्टीने सध्याच्या बाजार दरांनुसार सदर दर सुधारित करण्यात आले. तसेच या निविदेमध्ये उपयोगिता वाहिन्या ( युटीलिटी डक्ट) आणि पूर्वनिर्मित वाहिन्या ( प्रि कास्ट ड्रेन) या बाबींसह इतर कठोर मानकांचा समावेश करण्यात आला. या नवीन निविदेमध्ये रस्त्यांच्या गुणवत्तेवर अधिक लक्ष केंद्रीत करण्याच्या दृष्टीने अनेक नवीन व कठोर अटींचा समावेश करण्यात आला.
या निविदेत सहभाग नोंदविण्यांतर्गत बोली क्षमता ( बिड कॅपासिटी) ही अधिक कठोर करण्यात आली. मोठ्या रस्ते प्रकल्पांच्या कामांची क्षमता व कौशल्य असणा-या संस्थांनाच सहभाग नोंदविता येईल, अशा प्रकारच्या कठोर अटी समाविष्ट करण्यात आल्याचे म्हटले आहे.
या रस्ते कामांच्यावेळी प्रत्यक्ष कार्यस्थळी काम करण्यासाठी नेमण्यात येणारे तांत्रिक मनुष्यबळ हे आय. आय. टी., व्ही. जे. टी. आय., आर. ई. सी. यासारख्या प्रथितयश विद्यापीठातून प्रशिक्षित असणे आवश्यक करण्यात आले. तसेच हे मनुष्यबळ किमान १ वर्षापासून त्या कंत्राटदाराचे पगारी कर्मचारी असणे बंधनकारक असावे अशाप्रकारची अटही निविदेत आहे.
या पाचही निविदांसाठी मुंबई महानगरपालिकेला त्यामध्ये स्पर्धात्मकता आढळली. महानगरपालिका आता पुढील निविदा प्रक्रिया पार पाडत आहे. संपूर्ण निविदा प्रक्रिया ही इलेक्ट्रानिक पद्धतीने करण्यात आली आहे. सर्व दस्तवेजीकरण आणि संभाषणांची देवाणघेवाण ही फक्त अधिकृत इमेलद्वारेच करण्यात आली आहे. निविदांना मिळालेला प्रतिसाद हा अतिशय उत्तम होता, चांगल्या कामाबद्दल ओळखल्या जाणा-या प्रतिष्ठित अशा कंपन्यांनी निविदा सादर केल्या असून सर्व पॅकेज हे वेगवेगळ्या निविदाकारांना प्राप्त झाले आहेत. याबाबत निविदा प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात असून निविदाकारांशी अंतिम टप्प्यातील वाटाघाटी सुरु आहेत. यानंतर साधारणपणे पुढील आठवड्यात कार्यादेश देण्यात येतील, असे रस्ते विभागाने म्हटले आहे.
अंदाजित रकमेसाठी प्राप्त झालेल्या निविदा
- पश्चिम उपनगरे : ८२ किलोमीटर, किंमत १२२४कोटी(प्राप्त निविदा ०३)
- पश्चिम उपनगरे : १०६ किलोमीटर, किंमत १६३१ कोटी(प्राप्त निविदा ०३)
- पश्चिम उपनगरे : ६६ किलोमीटर, किंमत ११४५ कोटी (प्राप्त निविदा ०४)
- पूर्व उपनगरे : ७१ किलोमीटर, किंमत ८४६ कोटी रुपये (प्राप्त निविदा ०३)
- शहर विभाग: ७२ किलोमीटर, किंमत १२३३ कोटी रुपये (प्राप्त निविदा ०३)