राज्यसभेचे खासदार असलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे आगामी लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून तयारी करण्याची सूचना त्यांना भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्त्वाकडून करण्यात आल्याचे कळते. त्यामुळे उद्धव सेनेचे विद्यमान खासदार विनायक राऊत यांच्यासमोर तगडे आव्हान उभे राहणार आहे.
शिवसेना-भाजपामधील जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा शिवसेनेच्या वाट्याला येते. या सूत्राप्रमाणे शिंदे गटाकडून या जागेवर उमेदवार देण्याची तयारी सुरू होती. सुरुवातीला दीपक केसरकर आणि नंतर उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांचे नाव चर्चेत आले. किंबहुना सामंत यांनी लोकसभेच्यादृष्टीने तयारीही सुरू केली. त्यामुळे त्यांनाच तिकीट मिळणार, असा कयास बांधला जात होता.
मात्र, भाजपाने केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणात, उद्धव गट आणि शिंदे गटात अटीतटीची लढत होऊन काहीशे मतांच्या फरकाने बाजी पलटू शकते, असा अंदाज वर्तवण्यात आल्याने संभाव्य धोका टाळण्यासाठी तुल्यबळ उमेदवार देण्याचा निर्णय झाल्याचे कळते. त्यासाठी सुरुवातीला माजी खासदार निलेश राणे यांच्या नावाचा विचार झाला. किंबहुना नारायण राणे यांचाही निलेश यांच्यासाठी जोर होता.
परंतु, मिशन ४५ चे टार्गेट विनाव्यत्यय पूर्ण करण्यासाठी स्वतः नारायण राणे यांनी मैदानात उतरावे, अशी सूचना भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्त्वाकडून करण्यात आली. त्यामुळे नारायण राणे यांनी लोकसभा लढवण्याचे मान्य केले असून, ते तयारीलाही लागल्याची माहिती भाजपामधील सूत्रांनी दिली.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीमागचे कोडे उलगडले
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शुक्रवारी, १३ जानेवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली होती. त्याआधी सह्याद्री अतिथीगृहावर देवेंद्र फडणवीस आणि राणे यांच्यात गुप्त बैठक झाली. या भेटीमागचे कोडे आता उलगडले असून, रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेसंदर्भात राणे आणि शिंदेंमध्ये चर्चा झाल्याचे कळते. एकनाथ शिंदे यांनी पूर्ण ताकदीनिशी सहकार्य करण्याचे मान्य केल्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत नारायण राणे विरुद्ध राऊत, असा जंगी सामना रंगताना दिसणार आहे.
Join Our WhatsApp Community