कोकणी माणसाच्या उत्कर्षासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार – दरेकर

162

कोकणातील आम्ही सर्व आमदार कोकणी माणसाच्या उत्कर्षासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करू, अशी ग्वाही भाजपाचे विधानपरिषदेतील गटनेते प्रविण दरेकर यांनी शनिवारी दिली. ठाण्यातील कोकण ग्राम विकास मंडळातर्फे आयोजित मालवणी महोत्सवाचे उद्घाटन दरेकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

१३ जानेवारी ते २२ जानेवारी दरम्यान हा मालवणी महोत्सव सुरू राहणार आहे. उद्घाटन प्रसंगी आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, संदीप लेले, आयोजक सीताराम राणे, विकास पाटील, सचिन मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी दरेकर म्हणाले की, आपल्या गावाकडील लोकांचे स्टॉल, आपल्या माणसांच्या भेटीतील आपुलकी, जिव्हाळ्यापोटी मी आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहे. सलग २३ वर्षे सातत्याने सीताराम राणे हा महोत्सव अत्यंत उत्साहात साजरा करत आहेत. २३ वर्षे अशा प्रकारचा उत्सव करण्यासाठी कोकणच्या मातीविषयी आत्मियता असावी लागते, ती सीताराम राणे यांच्यात असल्याचे दरेकर म्हणाले.

‘मुंबईसह ठाण्याचाही कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही’

या महोत्सवाच्या निमित्ताने गावाकडील छोट्या व्यावसायिकाला बाजारपेठ मिळते. तसेच आर्थिक मदतही होत असते. परंतु मुंबई, ठाण्यातील ज्या कोकणी माणसाने ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या हातात सरकार दिले, त्यांनी कधीही कोकणी माणसाचा विचार केला नाही. २५ वर्षे मुंबई महापालिका, ठाणे महापालिकेत सत्ता उपभोगली. मात्र कोकणच्या तरुणांच्या, तरुणींच्या, व्यावसायिकांच्या हाताला काम देऊ शकले नाहीत आणि आता मुंबईच्या, कंत्राटदाराच्या गोष्टी करताहेत. सहा महिन्यांचा कालावधीत शिंदे -फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारचे वेगाने काम सुरू आहे. मुंबईचा कायापालट होतोय. जी-२०च्या माध्यमातून जो चेहरामोहरा बदलून आम्ही हे करू शकतो हा आत्मविश्वास दाखवला आहे. मुंबईसह ठाण्याचे भाग्य आहे. ठाण्याचे मुख्यमंत्री आहेत. काम करणारे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे मुंबईसह ठाण्याचाही कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही, असा आत्मविश्वासही दरेकर यांनी यावेळी व्यक्त केला.

मुंबई जिल्हा बँकेच्या माध्यमातून मदत करू

दरेकर पुढे म्हणाले की, कोकणात मच्छी असो, फलोत्पादन, टुरिझम असो यावर मोठ्या प्रमाणात व्यवसाय उभे राहायला पाहिजेत. या सगळ्या व्यवसायासाठी जी आर्थिक मदत लागेल ती मुंबई जिल्हा बँकेचे नेतृत्व करत असताना आपण कोकणवासियांसाठी करू याचा पुनरुच्चारही दरेकर यांनी केला. तसेच विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र येथे मोठ्या प्रमाणात प्रकल्प, उद्योगधंदे उभे राहताहेत. परंतु आमचा प्रामाणिक असणारा कोकणी माणूस अजूनही उद्योग धंद्यामध्ये ज्या पद्धतीने भरारी घ्यायला पाहिजे ती घेत नाही. परंतु आता शिंदे-फडणवीस सरकारच्या नेतृत्वाखाली आम्ही कोकणातील सर्व आमदार येणाऱ्या काळात कोकणी माणसाच्या उत्कर्षासाठी अतिशय प्रामाणिक प्रयत्न करू आमि कोकणच्या विकासात मुंबई-ठाण्याचे मोठे योगदान देऊ, असा विश्वासही दरेकर यांनी यावेळी व्यक्त केला.

(हेही वाचा – सत्यजित तांबेंना भाजपाचा उघड पाठिंबा की छुपा? १६ जानेवारीला दिल्लीत होणार फैसला)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.