शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर शिवसेना (उध्दव ठाकरे) आणि बाळासाहेब ठाकरे असे दोन गट पडल्यानंतर आता खरी शिवसेना कुणाची असा वाद सुरू झाला आहे. त्यामुळे शिवसेनेतून फुटून बाळासाहेबांची शिवसेना पक्षात अनेक पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी प्रवेश करत असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील दोन माजी महापौर आपल्या पक्षात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. परंतु हे दोन माजी महापौर कोण याकडे सर्वांचे लक्ष लागले असून प्रत्येक माजी महापौरांकडे शिवसेना पक्षातील पदाधिकारी आणि शिवसैनिक संशयाने पाहत आहेत.
मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकावला जाणार असल्याचे दोन्ही शिवसेनेकडून विश्वास व्यक्त केला जात असला तरी प्रत्यक्षात कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार हे आगामी महापालिकेच्या निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल. त्यामुळे दोन्ही पक्षांनी आपली ताकद लावण्याचा प्रयत्न केला असला तरी प्रत्यक्षात खरी शिवसेना कोणाची यावरील निर्णय अद्यापही न्यायप्रविष्ठच आहे. त्यामुळे बाळासाहेबांची शिवसेना पक्ष हा भाजपसोबत राज्यात सरकारमध्ये असल्याने या पक्षाकडे आता शिवसेनेतील पदाधिकारी वळत आहे. त्यानुसार बाळासाहेबांची शिवसेना पक्षात आता शिवसेनेचे पदाधिकारी प्रवेश करत असतानाच बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लवकरच मुंबईतील काही पदाधिकारी व शिवसैनिक आपल्या पक्षात प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले. त्यामध्ये मुंबईतील दोन माजी महापौरांचा समावेश असल्याचेही ते सांगायला विसरले नाही.
बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने अशाप्रकारचे संकेत दिल्यानंतर मुंबईतील माजी महापौरांकडे सर्वच संशयाचे पाहू लागले आहे. मुंबईत सध्या विशाखा राऊत, मिलिंद वैद्य, दत्ता दळवी, डॉ शुभा, श्रध्दा जाधव, महादेव देवळे, किशोरी पेडणेकर, स्नेहल आंबेकर, सुनील प्रभू आदी असून या पैंकी कोण दोन माजी महापौर आहेत, ज्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वाटेवर आहेत, याचा अंदाज आता सर्वंच बांधू लागले आहेत. त्यामुळे हे सर्व माजी महापौर सध्या संशयाच्या घेऱ्यात अडकले असून येत्या १८ जानेवारीला यापैकी कोणते माजी महापौर बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करतात ही केवळ अफवाच आहे हे स्पष्ट होणार आहे.
(हेही वाचा – तरीही निविदाकारांनी मुंबईतील रस्ते कामांसाठी स्वारस्य दाखवले!)