यंदा ‘महाराष्ट्र केसरी’ची गदा शिवराज राक्षेच्या हाती

212

महाराष्ट्र केसरीचा मानाचा किताब यंदा शिवराज राक्षेंने जिंकला आहे. महेंद्र गायकवाड विरुद्ध शिवराज राक्षे असा चित्तथरारक सामना सुरू होता. यामध्ये शिवराज राक्षेने बाजी मारून २०२३चा महाराष्ट्र केसरी ठरला आहे. पुण्यातील स्वर्गीय मामासाहेब मोहोळ क्रीडा नगरी कोथरुड येथे महाराष्ट्र केसरीचा हा अंतिम सामना रंगला होता.

महाराष्ट्र केसरीच्या सुरुवातीला माती विभागातील पहिली सेमी फायनल पार पडली. यामध्ये सिकंदर शेखचा महेंद्र गायकवाडने पराभव करत फायनलमध्ये धडक मारली होती. कुस्ती चालू झाल्यावर महेंद्र गायकवाडने पहिला गुण मिळवत खाते उघडले होते. परंतु पहिल्या फेरी अखेर सिकंदरकडे १ गुणांची आघाडी होती. दुसरी फेरी सुरू होताच सिकंदर आक्रमक झालेला दिसला. मात्र उंच पुरा गडी महेंद्रने बाहेरची टांग डावी टाकत ४ गुणांची कमाई केली. सिकंदरला सामन्याच्या अखेरपर्यंत सरशी साधू दिली नाही.

गादी विभागामध्ये हर्षवर्धन सदगीर आणि शिवराज राक्षे यांच्यात झालेल्या तुफान कुस्तीमध्ये पहिल्यापासूनच शिवराजने आक्रमण केले. पहिल्या फेरी अखेर शिवराजने ६ गुण मिळवले होते, तर एकवेळचा महाराष्ट्र केसरी हर्षवर्धनला एकही गुण घेता आला नव्हता. दुसऱ्या फेरीमध्ये १ गुण सोडता शिवराजने २ गुणांची विजयी आघाडी घेत विजय साकार केला. शिवराज राक्षेने हर्षवर्धनवर १-८ ने विजय मिळवला.

दरम्यान, ६५व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीत शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांनी धडक मारली आहे. अंतिम कुस्तीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यामध्ये शिवराज राक्षे याने बाजी मारली.

(हेही वाचा – मालिका जिंकल्यावर विराट-ईशान थिरकले; डान्सचा व्हिडिओ व्हायरल!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.