जर्मनीची ट्रम्प कंपनी करणार महाराष्ट्रात ३०० कोटींची गुंतवणूक

153

राज्यात गुंतवणूक वाढीसोबत रोजगार निर्मितीसाठी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत सध्या जर्मनीच्या दौऱ्यावर आहेत. पहिल्या दिवशी सामंत यांनी स्टुटगार्ट येथील ट्रम्प कंपनीला भेट दिली व गुंतवणूक वाढीबाबत सकारात्मक चर्चा केली. ट्रम्प कंपनी पुढील दोन वर्षांत महाराष्ट्रात सुमारे ३०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची शाश्वती यावेळी देण्यात आली.

जर्मनी दौऱ्यात सामंत यांनी स्टुटगार्ट येथील ट्रम्प कंपनीच्या उत्पादन निर्मिती केंद्राला भेट दिली. यावेळी ट्रम्प कंपनीचे सीईओ रिचर्ड बॅनम्युलर आणि ट्रम्प इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक संदीप पाटील यांनी सामंत यांचे स्वागत केले. बॅनम्युलर यांनी कंपनीच्या अत्याधुनिक लेझर कटिंग मशीन्स आणि फोल्डिंग मशीन्सचे सादरीकरण केले. विजेवर चालणाऱ्या वाहनांच्या (EV) बॅटरी आणि बॅटरी स्टोरेज युनिट्स तयार करण्यासाठी या मशीन्स वापरल्या जात आहेत. या मशीन्ससाठी ट्रम्फ कंपनी महाराष्ट्रात निर्मिती प्रकल्प सुरू करण्यास उत्सुक आहे. यासाठी सामंत यांनी कंपनीला महाराष्ट्र भेटीचे निमंत्रिण दिले असून त्यासाठी महाराष्ट्र शासन पूर्ण सहकार्य करेल असे आश्वासन दिले. कंपनीचे प्रतिनिधी पुढील महिन्यात महाराष्ट्राला भेट देऊन स्थळपाहणी करणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले. कंपनी सुमारे ३०० कोटी रुपयांची गुंतवणूक करेल, असे यावेळी सांगण्यात आले.

लॅप केबल्स समुहाला भेट

उद्योगमंत्री सामंत यांनी यावेळी स्टुटगार्ट येथील लॅप काबेल समूहाला भेट दिली. यावेळी बार्डनचे संचालक आणि भारताचे वाणिज्य दूत अँड्रियास लॅप यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी लॅप यांनी ईव्ही चार्जिंग केबल्समधील नवीन तंत्रज्ञान आणि पोर्टेबल ईव्ही अडॅप्टरचे सादरीकरण केले. समृद्धी महामार्गावर या तंत्रज्ञानाचा वापर करून यंत्रणा उभारण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. उच्च दर्जाच्या तांब्याच्या धातुसाठी प्रसिद्ध असलेल्या चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याला भेट देण्याचे कंपनीला निमंत्रण देण्यात आले.

(हेही वाचा – सत्यजित तांबेंना भाजपाचा उघड पाठिंबा की छुपा? १६ जानेवारीला दिल्लीत होणार फैसला)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.