बाळाच्या मेंदूचा विकास वयाच्या दुसऱ्या वर्षापर्यंत सर्वात जास्त होतो. बाळाच्या शारीरिक आणि मानसिक वाढीसाठी पहिली दोन वर्ष फारच महत्त्वाची असतात, अशी माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या डॉ. विनिता धवन यांनी दिली. त्यामुळे बाळाचा सांभाळ करताना त्यांच्या आरोग्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करु नका, असे आवाहन त्या करतात. कोरोना काळात जन्मलेल्या मुलांमध्ये लसीकरणाचे प्रमाण कमी राहिल्याने त्यांनी चिंता व्यक्त केली. लसीकरण मोठ्या प्रमाणात पूर्ण करण्यासाठी लोकांनी आपल्या मुलांना लसीकरणासाठी आरोग्य केंद्रात आणावे, असे आवाहनही त्यांनी केले.
( हेही वाचा : समृद्धी महामार्गावर विक्रमी टोलवसुली! महिन्याभरात साडेतीन लाखांहून अधिक वाहनांनी केला प्रवास )
बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी पहिल्या पाच वर्षामध्ये बाळाकडे दुर्लक्ष नको, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. या वयोगटात मुले अनेक गोष्टी आकलनाच्या माध्यमातून शिकतात. मातृभाषा तसेच सकारात्मक सवयी शिकवण्यासाठी या वयोगटातील मुलांकडे पालकांनी प्राधान्याने लक्ष द्यावे, असा सल्ला मालाड येथील न्यूऑन क्रिटीकेअर रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ डॉ. राजेश कासला देतात. पहिल्या दोन वर्षांत लहान मुलांच्या मेंदूची शारीरिक रचना ब-याच प्रमाणात विकसित होते. बालरोगतज्ज्ञ डॉ. अमोल अन्नदाते यांनी बाळाच्या मेंदूची सत्तर टक्क्याहून जास्त वाढ पहिल्या दोन वर्षांत होत असल्याचे सांगितले. या वयात लहान मुलांची काळजी घ्यावी याचीही माहिती त्यांनी दिली आहे.
लहान मुलांची काय काळजी घ्यावी :
- जन्मापासून सहा महिने केवळ आईचे दूध पाजणे.
- सहा महिन्यानंतर मुलांना घरी शिजवलेले अन्न हळूहळू खायला द्यावे. मूल वर्षाचे झाल्यानंतर त्याला पूर्ण अन्न थोडे-थोडे खायला द्यावे.
- नियमित लसीकरण करणे.
- बाळासोबत संवाद साधा, त्याच्याभोवती आनंदी वातावरण असू द्या.