उत्तर कोकणात थंडीचे वारे जोरदार वाहत असल्याने मुंबईकरांचा रविवार गुलाबी थंडीचा बसला. मुंबईत सांताक्रूझ येथे किमान तापमान थंडीच्या मोसमात पहिल्यांदाच १३.८ अंश सेल्सिअसवर घरसले. तर पश्चिम उपनगरातील काही भागांत किमान तापमान १० अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवले गेल्याची माहिती खासगी हवामान अभ्यासकांकडून दिली गेली. थंडीच्या प्रभावामुळे संपूर्ण मुंबई शहराच्या तुलनेत अंधेरी, वांद्रे-कुर्ला संकुल तसेच चेंबूर येथे प्रवास करणे धोक्याचे ठरु शकते, असा इशारा सफर या केंद्रीय पृथ्वी व विज्ञान संस्थेच्या ऑनलाईन प्रणालीतून दिला. या तिन्ही स्थानकांना रेड अलर्ट जारी करण्यात आला.
दृष्यमानताही खराब होण्याची भीती व्यक्त
थंडीच्या मोसमात वातावरणातील धूलिकण संबंधित ठिकाणी साचून राहतात. सूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण वाढल्यास वायू प्रदूषण वाढते. सध्या वातावरणात होणारी घट पाहता आता मुंबईत येत्या दिवसांत दृष्यमानताही खराब होण्याची भीती व्यक्त होत आहे. वाढत्या धूरक्यांच्या प्रभावात थंडीच्या दिवसांत मुंबईत विविध ठिकाणी दृष्यमानतेवर परिणाम होतो. रेड अलर्ट जारी केलेल्या ठिकाणी शक्यतो गर्भवती महिला, वृद्ध तसेच नवजात बालकांसह पालकांनी प्रवास करु नये, असा इशारा देण्यात आला आहे. या भागांत लाकूडही जाळू नका, परिणामी सूक्ष्म धूलिकणांमध्ये भर पडेल. सफर या ऑनलाईन प्रणालीने खराब स्थानके म्हणून जाहीर केलेल्या ठिकाणीही तोंडावर मास्क लावून जा, असे आवाहन करण्यात आले आहे. तर अतिखराब स्थानकाला भेट देण्यापूूर्वी तोंडावर एन-९५ मास्क लावा, असेही सफरच्यावतीने सांगण्यात आले.
(हेही वाचा ‘वन-डे’मध्ये विराटच बेस्ट; विश्वविक्रमापासून तीन शतके दूर)
विविध स्थानकांमधील सूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण (प्रति क्युबीक मीटरमध्ये)
- मुंबई – २९० – खराब
- बोरिवली – १०१ – ठीक
- मालाड – १५२ – ठीक
- भांडूप – १८० – खराब
- अंधेरी – ३०७- अतिखराब
- बीकेसी – ३५७ – अतिखराब
- नवी मुंबई – ३५३ – अतिखराब
- चेंबूर – ३३१ – अतिखराब
- वरळी -१११ – ठीक
- माझगाव – २३५- खराब
- कुलाबा – २८० – खराब