सोशल मीडियाच्या ‘boycott’ ने बॉलिवूड हादरले

180
नुकतेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मुंबईच्या दौऱ्यावर होते, तेव्हा त्यांनी आवर्जून बॉलिवूडमधील सिनेतारकांची एकत्रित भेट घेतली. मुख्यमंत्री योगी यांनी त्यांना मुंबईपेक्षा मोठी फिल्मसिटी उत्तर प्रदेशात उभी करायची आहे, अशी इच्छा व्यक्त केली. त्यावेळी अनेकांनी त्यांना सूचना केल्या. मात्र त्यात सुनील शेट्टी यांची सूचना वेगळी होती. त्यांनी ‘सध्या बॉलिवूडमधील चित्रपटांवर ‘बॉयकॉट’चा शिक्का मारला जात आहे, त्यामुळे बॉलिवूडचे मोठे नुकसान होत आहे. म्हणून याविषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करावी’, अशी सूचना त्यांनी केली. सोशल मीडियात सुरू झालेला हा ‘बॉयकॉट’ कालपर्यंत बॉलिवूडमधील कुणी महारथी गांभीर्याने घेत नव्हते. त्यांना त्यांच्या प्रसिद्धीवर भलताच गर्व होता. मात्र त्यांचे गर्वहरण सर्वात आधी ‘लाल सिंग चड्डा’ या चित्रपटानंतर झाले. बॉलिवूडचे कलाकार या ट्रेंडला गांभीर्यानी घेऊ लागले. सोशल मीडियामुळे बॉलिवूडकरांची झोप उडाली आहे. मात्र तरीही कुणी हे मान्य करून जाहीरपणे सरकारी पातळीवर बोलण्याची हिंमत केली नव्हती, तसे करणे त्यांना स्वतःचा पराभव झाल्याचे वाटत होते. त्यामुळे कालपर्यंत कुणी सरकारी पातळीवर ‘बॉयकॉट’वर बोलण्याची तसदी घेत नव्हते, मात्र यात सुनील शेट्टी अपवाद ठरला. सुनील शेट्टी हा बॉलिवूडमधील पहिला कलाकार आहे, ज्याने या ट्रेंड विषयी चिंता व्यक्त करून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यात हस्तक्षेत करावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूड रडारवर!

वास्तविक सोशल मीडियातून बॉलिवूडच्या चित्रपटांवर ‘बॉयकॉट’चा ट्रेंड उगाच सुरु झाला नाही. त्याला काही कारणे आहेत. २०२० साली बॉलिवूडचा अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा संशयास्पद मृत्यू झाला. त्यावेळी मोठ्या प्रमाणात तर्क-वितर्क लढवण्यास सुरुवात झाली. सुशांत सिंह राजपूत याने गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणी त्यांची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिला अटक करण्यात आली, त्यावेळी बॉलिवूडमध्ये सिनेतारका सर्रास अमली पदार्थांचे सेवन करतात ही धक्कादायक बाब समोर आली. एनसीबीचे मुंबईचे माजी प्रमुख समीर वानखेडे यांनी मुंबईत एकामागोमाग एक धाडसत्र सुरु केले आणि त्यात बॉलिवूडचे आयकॉन जाळ्यात सापडले, ज्यांनी अमली पदार्थांचे सेवन केले होते.

‘बॉयकॉट’चा पहिला फटका दीपिकाला!

एनसीबीच्या धाडसत्रांमधून जे सिनेतारखा सापडले ते तरुण-तरुणीचे आदर्श होते. सोशल मीडियात नेटकऱ्यांनी याच मुद्यावर जोर देत जे कुणी अमली पदार्थांचे सेवन करणारे सामोर आले त्यांच्यावर टीकेची झोड उगारली. त्यात दीपिका पदुकोणला मोठा फटका बसला. त्याचवेळी जवाहरलाल नेहरु विद्यापिठात (जेएनयू) तुकडे तुकडे गँगच्या साम्यवादी विचारांच्या विद्यार्थ्यांनी तोडफोड केल्याची घटना घडली होती. दीपिकाने जेएनयूमध्ये जाऊन त्या विद्यार्थ्यांची विचारपूस केली आणि दीपिका आणखी वादात सापडली. परिणामी सोशल मीडियात ‘बॉयकॉट दीपिका’ आणि दीपिकाच्या येणाऱ्या ‘छपाक’ चित्रपटाच्या विरोधात ‘बॉयकॉट छपाक’ हा ट्रेंड सुरु झाला. त्याचा परिणाम म्हणून दीपिका ज्या उत्पादनाच्या जाहिराती करत होती, त्या कंपन्यांनीही तात्काळ तिच्या जाहिराती बंद केल्या. पुढे ‘छपाक’ चित्रपटही जोरदार आपटला.

अमीर खानचे कोट्यवधीचे नुकसान

अमीर खान याचा ‘लाल सिंग चड्डा’ चित्रपट आला. सोशल मीडियात नेटकऱ्यांनी या चित्रपटालाही ‘बॉयकॉट’चा शिक्का मारला. कारण या चित्रपटात भारतीय सैनिकांचा अवमान केल्याचा आरोप होत होता. यात मंतिमंद व्यक्ती म्हणून दाखवण्यात आलेला अमीर खान सैन्यात भरती झाल्याचे दाखवण्यात आले होते. यावर नेटकऱ्यांनी अमीर खानने मे २०१४ मध्ये भाजप सत्तेत आल्यानंतर अल्पसंख्याकांवर वाढलेल्या कथित हल्ल्यांबद्दल तसेच देशातील धार्मिक असहिष्णुतेबद्दल बोलताना गेल्या ६-८ महिन्यांपासून भारतात ‘असुरक्षितता’ आणि ‘भीती’चे वातावरण वाढत असल्याचे जाणवत आहे, असे म्हटल्याचे आठवण करून दिली होती. या सगळ्याचा परिणाम म्हणून बिग बजेट ‘लाल सिंग चड्डा’ चित्रपटही आपटला. हृतिक रोशनने ‘लाल सिंग चड्डा’चे कौतुक केले, म्हणून त्याच्या आगामी ‘विक्रम वेधा’ सिनेमावर बहिष्कार टाकण्याची मोहीम नेटकऱ्यांनी सुरु केली. त्यानंतर कायम हिंदुत्ववाद्यांवर टीका करणारा दिग्दर्शक अनुराग कश्यप याच्या ‘दोबारा’ चित्रपटावर ‘बॉयकॉट’चा शिक्का मारण्यात आला. या चित्रपटातील नायिका आलिया भटला संताप अनावर झाला होता.

‘रक्षाबंधन’वरही बहिष्कार

यानंतर बॉलिवूड पुरते हादरले. त्यानंतर नेटकऱ्यांच्या टार्गेटवर अक्षय कुमारचा ‘रक्षा बंधन’ हा चित्रपट आला. या चित्रपटाच्या कथालेखकांपैकी एक असलेल्या कनिका ढिल्लन यांनी गोरक्षक आणि ‘मॉब लिंचिंग’ या विषयावरून हिंदुत्ववाद्यांना लक्ष्य केले. त्यामुळे सोशल मीडियातून ‘boycott rakshabandhan’ ट्रेंड सुरु झाला. अक्षय कुमारने या ट्रेंडचा परिणाम होणार नाही, असे म्हटले तरीही हाही चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटलाच.

आदिपुरुष चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे गेली

अशा प्रकारे सोशल मीडियातील हा ट्रेंड एकप्रकारे समांतर सेन्सॉर बोर्डासारखा परिणाम करू लागला. एखादा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी त्यात हिंदू धर्म, राष्ट्र, सैन्य यांचा अवमान आहे का, अशी पडताळणी नेटकरी करू लागले आणि त्यावर ‘बॉयकाॅट’चा शिक्का मारायचा का, असे ठरवण्यात येऊ लागले. रामायणावर आधारित ‘आदीपुरुष’ या चित्रपटाचा एक ट्रेलर प्रसिद्ध झाला, ज्यामध्ये रावण हा मुस्लिम मुघल राजा खिलजी सारखा दिसला, हनुमानाला विना मिशी आणि दाढीचा असा मुसलमान व्यक्तीसारखा दाखवण्यात आला होता. त्यामुळे नेटकऱ्यांनी ‘boycott adipurush’ असा ट्रेंड सुरु केला, त्यामुळे या चित्रपटाच्या निर्मात्याने तातडीने चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली.

दिग्दर्शक मीनाला मिळाला धडा

नेटकऱ्यांनी अशीच टीका ‘काली’ चित्रपटावर केली, कारण दिग्दर्शक मीना यांनी काली देवी सिगरेट फुंकत असल्याचे पोस्टर प्रसिद्ध करून चित्रपटाची प्रसिद्धी केली होती. हरिद्वारमध्ये मीनाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. या चित्रपटातून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप झाला. ज्यामुळे काली चित्रपटाला जोरदार फटका बसला होता.

‘द काश्मीर फाईल’ला दिला न्याय

इथे नेटकरी वाईटाला वाईट आणि चांगल्याला चांगलेच म्हणत असल्याचे प्रकर्षाने दिसून आले. कारण याच वर्षात २०२२मध्ये ‘दि काश्मीर फाईल्स’ हा काश्मिरातील हिंदूंचा कसा नरसंहार करण्यात आला त्याची कथा दाखवण्यात आली. मात्र या चित्रपटाला बॉलिवूडच्या सर्व प्रस्थापितांच्या व्यासपीठाने जाणीवपूर्वक दुर्लक्षित केले. कोणता पुरस्कार दिला नाही की अग्रगण्य दैनिकांनी चांगले रिव्ह्यू दिले नाहीत, काही ठिकाणी सिनेमाचे थिएटरचे स्क्रीन मिळाले नाही. त्यानंतर मात्र केवळ सोशल मीडियात नेटकऱ्यानी उचलून धरल्यामुळे हा चित्रपट आपटलेला पुन्हा उसळी मारून बॉक्स ऑफिसवर फुल झाला. आज या चित्रपटाचे ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन झाले आहे. त्यामुळे सोशल मीडियाला एकाच चष्म्यातून पाहण्याची चूक कुणी करू नये.

शाहरुख खान घाबरला

वर्षाच्या अखेरीस शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट ट्रोल झाला. त्यातील एक गाणे प्रदर्शित झाले, ज्याचे बोल ‘बेशरम रंग’ असे आहेत. त्यामध्ये दीपिका पदुकोण भगव्या रंगाची बिकिनी घातलेली आहे आणि शाहरुख खान सोबत ती अश्लील नृत्य करत आहे, असे दाखवण्यात आले. त्यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचे आरोप होऊन ‘boycott pathan’ असा ट्रेंड सुरु झाला. ज्यामुळे या चित्रपटाच्याही प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.