महाराष्ट्र केसरीचे पंच मारुती सातव यांना धमकीचा फोन आल्याचे समोर आले आहे. मुंबई पोलीस दलातील शिपाई संग्राम कांबळेने सातव यांना धमकी दिल्याची माहिती मिळत आहे. पैलवान सिंकदरविरोधात ४ गुण दिल्याने धमकी फोन करण्यात आला. याप्रकरणी मारुती सातव यांनी तक्रार अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे सध्या पोलीस याप्रकरणी अधिकचा तपास करत आहे.
एका मराठी खासगी वृत्तावाहिनीला पंच मारुती सातव यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी साडे बारा-एक वाजताच्या दरम्यान मी संग्राम कांबळे बोलतोय अशा व्यक्तीचा त्यांना फोन आला. यावेळी फोनवरील कांबळेने सातव यांना मुलगा आहे की मुलगी अशी विचारणा केली. तेव्हा सातव यांनी मुलगा आहे असे सांगितल्यानंतर फोनवरील कांबळे म्हणाले की, त्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून मी दिलेला निर्णय खरा आहे, अशी शपथ घ्या.
‘मला वाटतं नाही, मी कोणावर अन्याय केलाय. कारण अन्याय करण्यासाठी नाही, तर न्याय देण्यासाठी उभा असतो. असे फोन येत राहतील, तर अशा धमक्यांना मी बळी पडणार नाही’,असे सातव म्हणाले. दरम्यान फोन करणारा व्यक्ती संग्राम कांबळे हा पैलवान असून मुंबई पोलीस दलातील शिपाई आहे. या धमकीच्या फोनविरोधात संग्राम कांबळेवर कोथरुड पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
(हेही वाचा – यंदा ‘महाराष्ट्र केसरी’ची गदा शिवराज राक्षेच्या हाती)
Join Our WhatsApp Community