सोमवारी एका खासगी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शिवसेना नेते संजय राऊत यांनी डॉक्टरांबाबत केलेल्या विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. कोरोनाकाळात डॉक्टर्स आणि परिचारिका रुग्णालयातून पळून जात होते, या राऊतांच्या विधानावर राज्यातील डॉक्टरांनी निषेध व्यक्त केला आहे. राऊतांनी माफी न मागितल्यास आंदोलनाचा इशारा भारतीय वैद्यकीय संघटनेच्या महाराष्ट्र राज्य शाखेने दिला आहे.
प्रसार माध्यमांशी बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कोरोनाकाळातील डॉक्टर्स आणि परिचारिकांविरोधात भूमिका मांडली. राऊत म्हणाले की, कोरोनाकाळात डॉक्टर्स आणि परिचारिका रुग्णालयातून पळून गेले, ही चित्रफित आता व्हायरल होत आहे. या चित्रफितीबाबत माहिती मिळताच राज्यातील डॉक्टर्स राऊतांविरोधात चांगलेच संतापले आहेत. राऊत यांनी कोरोनायोद्ध्यांचा अपमान केल्याची टीका डॉक्टरांच्या संघटनेने केली आहे. याआधीही राऊत यांनी उपचारांसाठी डॉक्टरांची गरज नसल्याचे विधान केल्याची आठवण भारतीय वैद्यकीय संघटनेचे राज्याचे अध्यक्ष डॉ. रवींद्र कुटे यांनी केली. रुग्णांवर डॉक्टर नव्हे तर कम्पाउंडर उपचार करत असल्याचे विधान त्यांनी केले होते. या विधानावरही डॉ कुटे यांनी आक्षेप नोंदवला.
डॉक्टरांची भूमिका
- कोरोना काळात आरोग्य कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही. कित्येक डॉक्टरांचा रुग्णसेवा देताना मृत्यू झाला. दिवंगत डॉक्टरांच्या कुटुंबियांना अद्यापही सरकारकडून पुरेशी नुकसानभरपाई दिली गेलेली नाही.
- या काळात डॉक्टर्स, परिचारिका, आरोग्य कर्मचाऱ्यांनी रुग्णसेवेसाठी स्वतःला झोकून दिले होते.
- आरोग्यदुवांच्या कामाची दखल संजय राऊत यांच्या शिवसेना पक्षानेही घेतली. राज्यपाल तसेच स्वयंसेवी संस्थांनी आरोग्य कर्मचाऱ्यांचा गौरव केला.
- वाचाळवीर खासदार संजय राऊत यांनी कोरोनायोद्ध्यांचा अपमान केला आहे.
- राऊत यांनी माफी मागावी अन्यथा राज्यभर निषेध आंदोलने केली जातील.
(हेही वाचा – पवारांच्या इशाऱ्यावर राऊतांनी शिवसेना संपवण्याचा विडा उचलला; शिंदे गटातील खासदाराचा गौप्यस्फोट)
Join Our WhatsApp Community