२६ जानेवारीला दक्षिण आफ्रिकेतून भारतात येणार आणखी १२ चित्ते!

156

परदेशातून आणखी 12 चित्ते भारतात येणार आहेत. नामिबियातून सप्टेंबर 2022 मध्ये आणलेल्या चित्त्यांचा यशस्वी सांभाळ केल्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेतून आणखी 12 चित्ते भारतात आणले जाणार आहेत. हे चित्ते देखील मध्यप्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडले जाणार आहेत. मध्य प्रदेश सरकारने सोशल मीडियावर याबाबत माहिती शेअर केली आहे.

( हेही वाचा : अवघ्या २ दिवसात गंगा विलास क्रूझ नदीत अडकले; प्रवाशांना होडीतून आणले किनाऱ्यावर, काय आहे कारण?)

गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये नामिबियातून आणलेले 8 चित्ते सोडले गेले होते. त्यानंतर या परदेशी पाहुण्यांचे देशभरातील लोकांनी स्वागत केले. आता परदेशातून पुन्हा एकदा चित्ते भारतात येणार आहेत. मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कला आणखी चित्ते मिळणार आहेत. कुनो येथे नामिबियातून आणलेल्या 8 चित्तांचा यशस्वीपणे सांभाळ केल्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेतून चित्ते आणण्याची तारीखही निश्चित करण्यात आली आहे. 26 जानेवारीला चित्त्यांना कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात येणार आहे. कुनोला येणारे हे चित्ते आधीच दक्षिण आफ्रिकेत क्वारंटाईनमध्ये ठेवले आहेत. दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्ते आणण्यात येत आहेत. त्यापैकी 7 नर तर 5 मादी चित्ते आहेत. या चित्त्यांना 25 जानेवारीला दिल्लीहून ग्वाल्हेरला आणण्यात येणार आहे. त्यानंतर ग्वाल्हेरहून हेलिकॉप्टरने कुनो नॅशनल पार्कमध्ये नेण्यात येणार आहे. चित्त्यांना आणण्यासाठी केंद्रीय वन महासंचालक चंद्र प्रकाश गोयल, राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण (एनटीसीए) सदस्य सचिव एसपी यादव आणि केंद्रीय वन मंत्रालयाचे इतर अधिकारी 20 ते 21 जानेवारी रोजी दिल्लीहून दक्षिण आफ्रिकेला रवाना होतील. कुनो नॅशनल पार्क दक्षिण आफ्रिकेतील या नवीन पाहुण्यांच्या स्वागतासाठी सज्ज आहे.

नुकतेच मध्य प्रदेशचे वनमंत्री कुनो नॅशनल पार्कमध्ये आले होते. दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या12 चित्त्यांसाठी कुनोमध्ये केलेली व्यवस्था त्यांनी पाहिली. तसेच सुरक्षेशी संबंधित सर्व बाबींची सविस्तर माहिती घेतली.विशेष म्हणजे 1952 मध्ये भारत सरकारने देशातील चित्ता नामशेष झाल्याचे घोषित केले होते. शेवटचा चित्ता 1948 मध्ये छत्तीसगडमधील कोरिया जिल्ह्यात दिसला होता. भारतातून 1952 मध्ये ही प्रजाती नामशेष झाल्याचे घोषित केल्यानंतर 70 वर्षांनी नामिबियातून चित्त्यांचे आगमन झाले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.