गोरेगाव पूर्व येथील पहाडी गावातील मनोरंजन मैदानाच्या दोन जागा ताब्यात घेण्याचा निर्णय तब्बल १५ वर्षांपूर्वी घेण्यात आला होता. त्यानुसार २०१० रोजी या आरक्षित जमिनीच्या संपादनासाठी सुमारे १९ कोटी रुपये जिल्हाधिकारी यांच्याकडे जमा केली आहे. परंतु आता या जागेचे आरक्षण रुग्णालय असे करण्यात आले असून आता या जागेचा विकास जमिन मालकांकडून केला जाणार आहे. त्या अंतर्गत आता रुग्णालयाची इमारत जागा मालकाकडून केली जाणार आहे. त्यामुळे आता या जागेवर रुग्णालयाची इमारत बांधून मिळणार आहे. त्यामुळे या जमिन संपादनासाठी होणारा सुमारे ८८ कोटी रुपयांचा खर्च वाचणार आहे. त्यामुळे जमिन संपादनासाठी होणारा १९ होणार नसून उलट आता एकही पैसा खर्च न होता रुग्णालयाची इमारत महापालिकेच्या आराखड्यानुसार बांधून मिळणार आहे.
मुंबई महापालिकेच्या गोरेगाव पूर्व मधील नगर भू क्रमांक ४५६ आणि नगर भू क्रमांक ४५४ जी हे दोन्ही मनोरंजन मैदानांकरता आरक्षित भूखंड असल्याने सन २००८ मध्ये हे आरक्षित भूखंड ताब्यात घेण्याचा ठराव सुधार समितीने केला. हे दोन्ही भूखंड ४३२२ चौरस मीटर आणि १८८२ चौरस मीटर असून सुधार समिती आणि महापालिकेच्या ठरावानुसार तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या नगर भूमापन अधिकाऱ्यांमार्फत केलेल्या संयुक्त कारवाईमध्ये यासाठी अनुक्रमे १३.२१ कोटी रुपये व ५.७६ कोटी रुपये एवढी रक्कम उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्रमांक ४) यांच्या कार्यालयात जमा करण्यात आली आहे. या दोन्ही जागांच्या संपादनासाठी एकूण ६१.४० कोटी रुपये आणि २६.७६ कोटी रुपयांचा खर्च होणार आहे.
परंतु २०३४च्या मंजूर विकास आराखड्यात या दोन्ही भूखंडाचे आरक्षण हे रुग्णालयाकरता दाखवले गेले. त्यामुळे जमीन मालक असलेल सुनील फेरवानी यांनी खरेदी सूचनेबाबत वेळेत भूसंपादन प्रक्रिया पार न पाडल्याने हे आरक्षण रद्द झाल्याचा दावा करत न्यायालयात २००८ मध्ये धाव घेतली होती. परंतु या प्रक्रियेनंतर आता याठिकाणी रुग्णालयाचे आरक्षण पडल्याने त्यांनी आरक्षण समायोजन अंतर्गत आरक्षित जमिन विकसित करुन देण्याची तयारी दर्शवली आहे.
त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केलेली १३.२१ कोटी रुपये आणि ५.७६ कोटी रुपयांची रक्कम महापालिकेला परत करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे ही रक्कम परत मिळणार आहे. तसेच एकूण भूखंडाच्या ४० टक्के जागेवर एकूण क्षेत्रफळाच्या ५० टक्के एवढ्या क्षेत्रफळाची बांधीव रुग्णालयाची इमारत मोफत बांधून देण्याची तयारी दर्शवली आहे. विकास आराखड्यातील नियमांच्या आधारे रुग्णालयाचे बांधीव क्षेत्र महापालिकेला मिळणार असल्याने महापालिकेला जमिन संपादनासाठी लागणारा कोट्यवधी रुपयांचा खर्च वाचणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आतापर्यंत दोन्ही भूखंडाच्या संपादनासाठी जमा केलेला सुमारे ८८ कोटी रुपयांची रक्कम महापालिकेला परत मिळणार आहे. त्यामुळे या पूर्वी सुधार समितीने केलेल्या दोन्ही भूखंडाच्या भू संपादनाचा प्रस्ताव रद्द करण्याचा निर्णय घेतला. याला प्रशासकांनी मंजुरीही दिली आहे.
Join Our WhatsApp Community