अनिवासी भारतीय म्हणजेच एनआरआय व्यक्ती भारतात आल्यानंतर त्यांना आता युपीआयचा वापर करता येणार आहे. काही निवडक देशांच्या व्यक्तीला या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. NRE अथवा NRO या अकाऊंट्सचा वापर करून नागरिकांना युपीआयवरून पेमेंट करता येणार आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार इंटरनॅशनल नंबर्ससाठीही युपीआय सुविधा उपलब्ध करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ही सुविधा जगभरातील १० देशांना काही अटींसह लागू केली जाणार आहे.
( हेही वाचा : राज्याच्या जीआरमध्ये हिंदीचा राष्ट्रभाषा असा उल्लेख! सोशल मीडियावर चर्चांना उधाण)
या १० देशांचा समावेश
- सिंगापूर
- ऑस्ट्रेलिया
- कॅनडा
- हॉंगकॉंग
- ओमान
- कतार
- यूएसए
- सौदी अरेबिया
- युनायटेड किंगडम
- युएई
या १० देशांतील NRI नागरिकांसाठी ही सुविधा उपलब्ध होणार आहे. या युपीआय पेमेंटसाठी काही अटी बंधनकारक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यासाठी रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाची मार्गदर्शक तत्व आणि सूचनांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.
परदेशात पेमेंट कसे करावे, आर्थिक चलनाबाबत काय प्रक्रिया आहे याबाबत आपल्याला माहिती नसते परंतु आता चिंता करण्याची गरज नाही कारण, तुम्हाला UPI द्वारे आपल्या भारतीय बॅंक खात्यांमधून पेमेंट करता येणार आहे. युरोपमध्ये सुद्दा आता UPI प्रणाली सुरू झाली आहे.
बाहेरील देशात UPI पेमेंट कसे कराल?
- भारतीय बॅंकेशी UPI सेवा लिंक असणे गरजेचे आहे.
- तुमच्या मोबाईलमध्ये भीम UPI अॅप डाऊनलोड करा.
- जगभरात ही सेवा पॉसमध्ये ( पॉइंट ऑफ सेल) उपलब्ध असेल.
- UPI बरोबर एनपीसीआयच्या रूपे कार्डचा सुद्धा युरोपात वापर करता येईल.
- युरोपात यूपीआयचा वापर क्विक रिस्पॉन्स क्यूआर कोडच्या ( QR Code) साहाय्याने करावा लागेल.
- UPI च्या साहाय्याने पेमेंट केल्यावर त्यासाठी संबंधित देशातील चलनाप्रमाणे शुल्क आकारले जाईल.